मुंबई:-कोकणातील पाण्याची समस्या लक्षात घेत कोकणच्या शाश्वत विकासासाठी काम करणाऱ्या आभासी जलपरिषदेची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून या माध्यमातून पाण्याची दुर्भिक्ष संपविण्यासाठी मदत होईल, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या आभासी जल परिषदचे उद्घाटन करताना व्यक्त केले.
श्री. सामंत म्हणाले, भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याच्या समस्येची दखल घेत सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. कोकणामध्ये मुबलक पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे सगळे पाणी समुद्राला जाऊन मिळते. या जल परिषदेच्या माध्यमातून नक्कीच कोकणच्या शाश्वत विकासाला गती मिळेल. विशेषतः पाणी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे, हा सकारात्मक संदेश देशभरामध्ये जाण्यासाठी मदत होईल.
समुद्राच्या पाण्याचा उपयोग तंत्रज्ञानाचा वापर करून पिण्यासाठी करता आला तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल. पावसाचे वाया जाणारे पाणी अडवून त्याची साठवणूक करून ते जर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी आपण वापरू शकलो तर कोकणामध्ये जलक्रांती होईल, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रातीतल पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मोठ-मोठी बंधारे आणि धरणे बांधण्याऐवजी छोटे-छोटे धरणे आणि बंधारे बांधले तर महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सहज सुटू शकेल. राजस्थानमध्ये हा प्रयोग यशस्वीरित्या साकारला आहे. सरासरी ३००० मिमी. पाऊस पडणाऱ्या सिंधूदुर्ग जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे अरिष्ट गेल्या अनेक वर्षापासून कोकणातील अनेक भागात जाणवत आहे, त्यामुळे या भीषण प्रश्नांची उकल करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेणे स्वागताहर्य बाब आहे, असे मत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
‘मॅनेजमेंट ऑफ एक्वेटीक हेल्थ अँड रिसॉर्सेस ऑफ कोकण विथ स्पेशल एम्फेसिस ऑन सिंधुदूर्ग’ या संकल्पनेवर या एक दिवसीय राज्यस्तरीय आभासी परिषदेचे आयोजन मुंबई विद्यापीठ, सिंधू स्वाध्याय संस्था आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्याल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या परिषदेमध्ये ५२ सहभागी व्यक्तींनी आपले संशोधन अहवाल सादर केले. या परिषदेमध्ये सादर झालेल्या संशोधनावरती एक संशोधन पत्रिका तयार केली जाणार आहे. यासाठी एक संशोधन मंडळ तयार केले असून त्यांच्या मार्फत हे संशोधन सर्वांना सहजपणे उपलब्ध होणार आहे. वॉटर रिसॉर्स मॅनेजमेंट, पॉल्यूशन अँड वॉटर क्वालिटी, वॉटर अँड बायोडायव्हर्सिटी, सोशियल कल्चरल इकॉनोमिक इम्पॅक्ट आणि इतर सर्व विषय अशा पाच ट्रॅकवर या परिषदेत प्राध्यापक, विशेतज्ज्ञांनी या परिषदेत आभासी पद्धतीने संशोधनपर सादरीकरण केले.
या परिषदेमध्ये जलतज्ञ राजेंद्र सिंग, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, परिषदेच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. विनायक दळवी, अधिष्ठाता, प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला. या आभासी परिषदेचा समारोप राष्ट्रगीत म्हणून झाला.
परिषदेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे माजी शिक्षण मंत्री मा. अंबरीशभाई पटेल, हिरवळ संस्थेचे प्रमुख किशोर धारिया, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतूल साळुंके, भूगर्भशास्त्रज्ञ वडतबायकर, पॅनेल डिस्कशनचे अध्यक्षपद भूषविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. बी. ए. चोपडे यांनी सहभाग नोंदविला.