रत्नागिरी:-स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने प्रतिवर्षी प्रमाणे २०१९-२० या वर्ष अखेरीचे दिवशी आपली आर्थिक आकडेवारी जाहीर केली असून संपत असलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला ५ कोटी १५ लाखांचा निव्वळ नफा झाला असून नफ्यामध्ये २५ % वाढ झाली आहे. उत्तम सातत्य राखत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने भक्कम आर्थिक पायावर संस्थेची उभारणी केली आहे असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले. संस्थेची सर्व आकडेवारी ३१ मार्चचे सायंकाळीच घोषित करण्याचा कटाक्ष संस्थेने गेली २५ वर्षे सातत्यपूर्ण राखला आहे. तोच परिपाठ कायम ठेवत २०१९-२० या वर्षाची आकडेवारी जाहीर करतांना मनापासून आनंद होतो, अभिमानही वाटतो असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
२०१९-२० या आर्थिक वर्षात संस्थेने ० % N.P.A प्रमाण राखले असून ९९.८९% एवढी विक्रमी वसुली केली आहे. संस्थेच्या ११ शाखांची वसुली १०० % असून वितरीत आर्थिक स्थिती आणि लॉक डाऊनचे आव्हान असतानाही कर्जदारांनी दिलेल्या उत्तम सहकार्यामुळे विक्रमी वसुली कायम राखता आली. वसुली यंत्रणा आणि सर्व नियमित हप्ते भरणारे कर्जदार यांना मनापासून धन्यवाद देत असल्याचे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
२०१९-२० आर्थिक वर्ष अखेर संस्थेचे भाग भांडवल १ कोटी ०४ लाख झाले असून संस्थेचा स्वनिधी २३ कोटी २८ लाख झाला आहे. संस्थेच्या ठेवी २०१ कोटींच्या झाल्या असून संस्थेची येणे कर्ज १४१ कोटी ३८ लाखांची झाली आहेत. संस्थेने वितरीत केलेली ९३% कर्जही पूर्ण सुरक्षित कर्ज आहेत. संस्थेने कायद्यानुसार आवश्यक स्टॅटयुटरी तरलता २५% राखली असून संस्थेने ८५ कोटी ७० लाखांची बँक गुंतवणूक केली आहे. संस्थेच्या स्थावर मालमत्ता ४ कोटी २४ लाखांच्या झाल्या आहेत आणि महत्वपूर्ण म्हणजे संस्थेच्या १७ शाखा ह्या नफ्यात आहेत. पुणे शाखेनेही ९ लाख ७४ हजारांचा नफा कमावला असून रत्नागिरी शाखेत १ कोटी १६ लाखांचा तर प्रधान कार्यालयाने १ कोटी ६ लाखांचा नफा प्राप्त केला. त्या खालोखाल पावस शाखेने ७४ लाख ४३ हजारांचा नफा प्राप्त केला आहे.
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सातत्यपूर्ण अर्थकारणाची गती राखत आपले अर्थकारण केले आहे. पूर्ण पारदर्शक रहात आदर्श प्रमाणे पाळत आणि थकबाकी होवू न देता संस्थेने २९ वर्ष आर्थिक मार्गक्रमण केले त्यातून विश्वासार्हता निर्माण झाली आणि मोठा ग्राहकवर्ग संस्थेशी निगडीत झाला आहे.
सर्व उपलब्ध निधीचा पर्याप्त वापर करत संस्थेने नफा खोरी न करता सणसणीत नफा प्राप्त केला. या नफ्यामधून कोरोनामुळे निर्माण झालेला आर्थिक लॉक डाऊन फटका मंदावलेले अर्थकारण यातून उभारी घेण्यासाठी नफ्यामधून २५ ते ३० लाखाची संस्थेजवळ संलग्न असलेल्या ३५००० ग्राहक सभासदांचे हीत रक्षणासाठी संस्था सामाजिक बांधिलकी जपण्याची भूमिका घेवून २५ ते ३० लाख रुपयांची विशेष कर्जदार आधार योजना नफा वाटणीचे वेळी शिफारस करेल आणि माहे सप्टेंबर मध्ये या योजनेचा लाभ थेट पद्धतीने दिला जाईल.
नविन आर्थिक वर्षातील सर्व उद्दीष्ट ही ३० जून नंतर निश्चित केली जातील. कर्जांवरील व्याज कमी करणे, पिग्मिदार ग्राहकांसाठी तात्काळ कर्ज उपलब्ध करून देणेबाबत निर्णय केला जाईल. ठेव तारण कर्जावरील व्याजदर कमी करणे त्याचबरोबर हप्त्यांचे पुर्नगठन करण्याबाबत सहकार खात्याची परवानगी घेतली जाईल असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले.
स्वरूप भेट योजना ही गरजूंना शिधा पुरवणारी योजना गरजेनुसार विस्तारित करत आजपर्यंत ४०० पेक्षा जास्त व्यक्तींना म्हणजे जवळजवळ १२५ कुटुंबांना स्वरूप भेट घरपोच देण्यात आली आहे. लॉक डाऊनची स्थिती, त्यानुसार उद्भवणारी परिस्थिती यानुसार वेळोवेळी धोरण ठरवून योग्य तो भार उचलला जाईल असे अॅड.दीपक पटवर्धन म्हणाले. पंतप्रधान सहाय्यता फंडाला ५० हजार योगदान देण्याचा निर्णय केला आहे.
संस्थेच्या उत्तम आर्थिक स्थितीचा अहवाल सादर करतांना सहकार चळवळीत चांगल योगदान देता आल याचा अभिमान वाटतो. वितरीत आर्थिक स्थितीत ही स्वरुपानंदांचे काम अचूक शिस्तबद्ध विश्वासार्ह राहिले हे सहकार क्षेत्रासाठी प्रेरक ठरेल असे प्रतिपादन अॅड.दीपक पटवर्धनयांनी केले व संस्थेला सहकार्य करणारे ठेवीदार, कर्जदार व अन्य ग्राहक या सर्वांना धन्यवाद दिले.