रखडलेला डिझेल परतावा तात्काळ द्या; मच्छीमारांची मागणी.

रत्नागिरी:-कोरोनामुळे राज्यभरात केलेल्या लॉकडाऊनचा फटका मच्छीमारीलाही बसला आहे. व्यवसायच होत नसल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेल्या मच्छीमारांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यावर उपाय म्हणून रखडलेला डिझेल परतावा मच्छीमारांना तत्काळ द्यावा अशी मागणी मच्छीमारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मत्स्य मंत्र्यांकडे केली आहे.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन असल्यामुळे मच्छि खरेदी करण्यासाठी कोण येत नाहीत. नौका बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे मच्छिमारांना गेले 3 वर्षे न मिळालेल्या डिझेल परताव्यासाठी तसेच 5-6 वर्षे न मिळालेल्या 55 टक्केसाठीच्या (मार्च 2020) अर्थसंकल्पात मंजुर झालेली आर्थिक तरतुद इतरत्र न वळविता मच्छिमारांना तातडीने देण्यात यावी नाहीतर करोना ग्रस्तांसारखी परिस्थिती मच्छिमारांवर ओढवणार आहे असे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
मच्छीमारांना तीन वर्षांपुर्वीचा परतावा मिळालेला नाही. परताव्यापोटी 58 कोटी रुपये अंर्थसंकल्पात मंजूर केले आहेत. ती फाईल मंत्रालयात पडून आहे. सध्या बोटी किनार्‍यावर असल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. परताव्याची जी काही 15 ते 20 टक्के रक्कम मिळेल ती मच्छीमारांसाठी उपयुक्त आहे. याकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.