रत्नागिरी:-तामिळनाडू येथून प्रशिक्षणासाठी आलेले दोनशे विद्यार्थी लॉक डाऊनमुळे रत्नागिरीत अडकले. या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाद्वारे तामिळनाडू सरकारकडे मदत मागितली. तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकारची याबाबत मदत घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी पोलिसांना सूचना केल्या त्यानुसार अवघ्या काही तासात या विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. या मदतीची माहिती मिळताच तामिळनाडू सरकारने महाराष्ट्र सरकार आणि रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले.
व्यवसाय प्रशिक्षणासाठी तामिळनाडूतून रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीत आलेल्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला.अत्यावश्यक साहित्य संपल्यानंतर जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे सोशल मीडियाद्वारे मदतीची मागणी केली.त्यानंतर तामिळनाडू मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना विद्यार्थ्यांना मदत करण्याची विनंती केली.ना. ठाकरे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना विद्यार्थ्यांना अत्यावश्यक साहित्य देण्याचे आदेश दिले होते. डॉ. मुंढे यांनी तात्काळ याची दखल घेत सर्व विद्यार्थ्यांची मंगळवारी जेवणाची व उर्वरित दिवसांसाठी जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली आहे. परंतु या विद्यार्थ्यांना जिल्हा सोडण्याची परवानगी देण्यात येणार नसल्याचे डॉ. मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
वस्तू खरेदी-विक्री मार्केटिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तामिळनाडूतील सुमारे दोनशे विद्यार्थी मिरजोळे एमआयडीसीत केले अनेक वर्ष येतात. येथे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर ते पुन्हा तामिळनाडू जातात. प्रशिक्षणासाठी सध्या तामिळनाडूतून आलेल्या नव्या तुकडीला कोरोनाच्या लॉकडाऊनचा फटका बसला. जीवनावश्यक वस्तू संपल्याने विद्यार्थ्यांची उपासमार सुरू झाली होती.याबाबत विद्यार्थ्यांनी थेट तामिळनाडू मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे संपर्क साधून विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना याबाबतचे आदेश दिले.
डॉ. मुंढे यांनी आपल्या अधिकारी-कर्मचारी मार्फत सर्व विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली तर एमआयडीसीतील दुकानातून त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी तासाभरातच विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था केली याची माहिती विद्यार्थ्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरद्वारे पोलिसांचे आभार मानले आहे.