कोरोनामुळे संपुर्ण देश त्रस्त झाला असून अत्यावश्यक वस्तूंची मोठ्याप्रमाणात गरज भासत आहे. त्यासाठी मदत म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फंडातून आणि कर्मचार्याचा एक दिवसाचा पगार असे मिळून सुमारे 1 कोटी 85 लाख रुपये पंतप्रधान फंडासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे भारत आणि जगभरातील सद्यस्थिती गंभीर आहे. या विषाणूला आळा घालण्यासाठी आणि सर्वांना आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करीत आहे. त्याला पाठिंबा म्हणून कोकण रेल्वेने जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. कोकण रेल्वे गेल आठ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काही कोटींचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याही परिस्थितीत कोरोना विरुद्ध राष्ट्राच्या लढाईला मदत करण्यासाठी अतिरिक्त पाऊल म्हणून कोकण रेल्वेने सीएसआर फडांकडून मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसआरमधून 1 कोटी 6 लाख आणि कर्मचार्यांच्या एका दिवसाच्या मूलभूत वेतनातून 79 लाख 50 हजार रुपयांचे योगदान पंतप्रधान फंडासाठी दिले आहेत. कोकण रेल्वेमध्ये सुमारे चार हजाराहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थिती हा निधी नागरिक सहाय्य आणि मदत (पीएम फंड) फंडासाठी दिली आहे. कोकण रेल्वेने कोरोना व्हायरसच्या विरोधात राष्ट्राच्या लढाला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी एल के वर्मा यांनी पत्रकाद्वारे दिली.