ना. उदय सामंत यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती.
रत्नागिरी:- जिल्ह्यात पुणे मुंबई येथून 58 हजार लोक आले यात 858 विदेशी पर्यटकांची नोंद आहे. 19 जणांचे अहवाल कोरोना निगेेेटिव्ह आले आहेत. जिल्हा आता कोरोनामुक्त झाला असल्याचे ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी उदय सामंत म्हणाले, कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्याची यंत्रणा चांगली राबली. जिल्ह्यात 19 संशयित होते, त्यांचेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 840 लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात पुणे, मुंबई येथून तब्बल 58 हजार लोक आल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. मात्र त्यांच्यापासून काहीच धोका नाही. बहुतेक लोक संचारबंदी लागू होण्यापूर्वी पंधरा दिवस ते महिनाभर आधी आलेले आहेत. आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली तरी जिल्हा रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून जाहीर करण्याची तयारी देखील प्रशासनाने ठेवली आहे. त्यासाठी 300 बेडस् तयार केले आहेत. हा भाग पूर्ण आयसोलेट केला जाईल, अशी तयारी आहे. मात्र आपल्यावर तशी वेळ येणार नाही. तसेच विदेशातून आलेल्या 858 पर्यटकांची नोंदही आपल्याकडे आहे. ते देखील निगराणीखाली आहेत. उद्यापासून संचारबंदीची अंमलबजावणी अधिक कडक केली जाणार आहे. पोलिस आपल्या आरोग्याच्या काळजीपोटी हे सर्व करीत आहेत. हा सांघिक लढा असल्यामुळे सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले.
बाहेरून येणार्यांसाठी सेंटर कॅम्प
शहराबरोबर ग्रामीण भागातही होम डिलिव्हरी सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी सरपंचांशी संपर्क सुरू आहे. कोणत्याही पक्षाचे लेबल न लावता सर्वांना बरोबर घेऊन ही सुविधा जनतेला दिली जाणार आहे. शिवभोजन थाळीचे उद्दीष्ट देखील तिप्पट वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून येणारे आणि सीमेवर लॉक केलेले तसेच कंपन्या बंद पडल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्यांना त्याचा फायदा होईल. महिला बचतगटांना हे काम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाहेरून आलेल्या लोकासाठी सेंटर कॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था केली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.