रत्नागिरी कारागृहातील 13 कैद्यांना अंतरिम जामिन.

रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात वर्षापेक्षा कमी शिक्षा होवू शकते अशा कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रत्नागिरी कारागृहातील 13 कैद्यांना अंतरिम जामिन मंजूर करण्यात आला आहे. या 13 कैद्यांना 45 दिवसाच्या अंतरिम जामीनावर सोडण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातून ज्या कच्चे कैद्यांना 7 वर्षांपर्यंत शिक्षा होवू शकते अशा 16 कैद्यांचा प्रस्ताव जिल्हा न्यायालयाच्या समितीकडे सादर करण्यात आला होता त्यानुसार यातील 13 कैद्यांना पहिल्या टप्प्यात 45 दिवसांच्या अंतरिम जामीन मंजूर झाल्याने शनिवारी त्यांची सुटका करण्यात आली. यामध्ये 12 पुरूष कैदी तर 1 महिला कैदी यांचा समावेश आहे. उर्वरीत कैद्यांबाबत पुढील आदेश आल्यानंतर टप्याटप्याने अंमलबजावणी केली जाणार आहे.

रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात विविध गुन्ह्यातील शिक्षा सुनावणी प्रक्रीयेतील (कच्चे कैदी) 160 कैदी आहेत. कारागृहाची क्षमता 200 इतकी आहे. ज्या कैद्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते अशा 16 कैद्यांचा पस्ताव कारागृहाने समितीसमोर सादर केला होता. यावर अंतिम निर्णय होवून 13 कैद्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला.