रत्नागिरीत दुचाकीचालकांवर कारवाईला सुरुवात

रत्नागिरी:-शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून जिल्ह्यातील शहरी भागात दुचाकी वापरास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची काटेकोरपणे अमलबजावणी सुरू झाली आहे. रविवारी सकाळ पासून रत्नागिरी शहरात दुचाकी चालकांवर कारवाईची जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे. जिल्ह्यात सापडलेल्या संशयितांचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी प्रशासनाकडून चोख सुरक्षिततेची खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 700 पेक्षा अधिक जणांचे विलीगिकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. यासाठी शनिवारी मध्यरात्री पासून जिल्ह्याच्या शहरी भागात दुचाकी वापरास बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता दुचाकी वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
कारवाईची सुरुवात वाहतूक पोलिसांनी रविवारी सकाळ पासून हाती घेतली. रविवारी सकाळी गाड्यांना जामर लावण्यास सुरुवात झाली. पोलिसांच्या कारवाईचा धसका घेऊन अनेकांनी घरीच बसने पसंत केले.