रत्नागिरी:- जिल्ह्यात विविध रुग्णालयात विलगीकरणासाठी ठेवलेल्या रुग्णांची संख्या 36 वर पोचली आहे. त्यात खेड शहराजवळील भोस्ते येथील एकाच कुटुंबातील 7 संशयितांचा समावेश असून त्यांना कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयातील उपचारासाठी दाखल केले आहे. 19 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात रविवारी संशयित रुग्णांची संख्या 15 ने वाढली आहे. त्यात कळंबणी 7, संगमेश्वर 1, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय 7 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात 19 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 57 जणांना उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात 36 रुग्णांना क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. जिल्हयात जेएसडब्लू, जयगड पोर्ट तसेच येथील औद्योगिक वसाहतीत असणार्या कंपन्यांनी त्यांच्याकडील रोजंदारीवर असणार्या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली आहे. सर्व तालुक्यातील अशा कामगारांची संख्या 474 इतकी असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था नसलेल्यांची संख्या 21 आहे. खेड येथे निवारा केंद्रात 12 व दापोली येथे 9 जणांची व्यवस्था केली आहे. तपासणीसाठी नमुने पाठविलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. होम क्वारंटाईनखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 735 इतकी आहे.
कोरोना ने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळे खबरदारीचे उपाय करीत असूनही कोरोना संशयित खेड शहराजवळ भोस्ते गावात आढळून आल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. उपलब्ध माहितीनुसार ज्या कुटुंबातील सात व्यक्ती कोरोना संशयित म्हणून मिळाल्या आहेत. त्या सातही संशयित रुग्णांना आयसोलेशन प्रभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने रात्री उशिरा पुणे येथील लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या त्या कुटुंबातील सदस्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहिती घेण्याचे काम प्रशासन करीत असून आणखी काही कोरोना संशयित सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तालुका प्रशासन त्यादृष्टीने कोरोना संशयितांची शोध घेत आहे.