ग्रामीण ,निमशहरी, शहरी भागात या संकट काळात रुग्णसेवा करणाऱ्या खासगी डॉक्टरना सुरक्षिततेची साधने व डॉक्टरांना विमा सुरक्षा द्यावी.

गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे मागणी!

देवरुख:-कोरोना साथीच्या काळात ग्रामीण,निमशहरी,शहरी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरना सुरक्षिततेची साधने व शासनामार्फत विमा संरक्षण द्यावे अशी मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ईमेल द्वारे केली आहे.

मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रात खंडागळे यांनी म्हटले आहे की,सर्वसामान्य नागरिकांचा कोणत्याही हॉस्पिटलशी संबंध येण्याआधी त्यांचा खासगी फॅमिली डॉक्टर हाच त्यांचा देवदूत असतो.
आपल्या ग्रामीण व निमशहरी भागातील बहुसंख्य आरोग्य व्यवस्था याच खासगी डॉक्टर वर अवलंबून असते.
यात अगदी एमबीबीएस पासून बीएएमएस,बीएचएमएस व अन्य मान्यताप्राप्त डॉक्टरांचा समावेश आहे.
सरकारने केलेल्या आवाहनाला व अनेक संघटनांनी व नागरिकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत खासगी डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता या संकटकाळी ग्रामीण ,निमशहरी ,शहरी भागात सर्वसामान्य नागरिकांना रुग्णसेवा देत आहेत परिणामी डॉक्टरांची व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता देखील महत्वाची असल्याचे खंडागळे यांनी म्हटले आहे.
कोरोना या महाभयंकर साथीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अन्य आजारांच्या बाबतीत उपचार मिळणे तितकेच गरजे असून ते काम खासगी डॉक्टर करत आहेत.कोरोना साथ आहे म्हणून या काळात अन्य आजारांनी पीडित रुग्णांची संख्या कमी होणार नाही,त्यांना त्यांची नियमिताच्या तपासण्या व उपचार घ्यावे लागणार आहेत…आणि ही जबाबदारी त्या रुग्णांचे फॅमिली डॉक्टर म्हणून खासगी डॉक्टर पार पाडत आहेत याकडे खंडागळे यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे.
या महाभयंकर कोरोना साथीच्या काळात संसर्गजन्य असणाऱ्या कोरोना ची बाधा रुग्णसेवा देणाऱ्या या खासगी डॉक्टर ना होऊ नये म्हणून खबरदारी चा उपाय म्हणून त्यांना सुरक्षिततेची साधने शासन मार्फत उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सुहास खंडागळे यांनी केली असून
ग्रामीण भागात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरना आर्थिकदृष्ट्या महाग असणारी सुरक्षिततेच्या बाबतची उपकरण /साधने परवडणार नाहीत,ती अनेकवेळा उपलब्ध ही होत नाहीत….आजच्या घडीला ग्रामीण भागात रुग्णसेवा सुरळीत राहणे आवश्यक आहे.वेगवेगळ्या गावात,निमशहरी भागात असणारे खासगी डॉक्टर हे या भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत.
ही बाब लक्षात घेऊन यावर उपाययोजना करावी असे खंडागळे यांनी या ईमेल मध्ये म्हटले आहे.

त्याच बरोबर या महाभयंकर कोरोना साथीच्या संकट काळात एखाद्या सैनिकाप्रमाणे लढणाऱ्या व स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्ण सेवा देणाऱ्या खासगी डॉक्टरांचाही विमा शासनाने काढावा,या खासगी डॉक्टरांसाठी जे काही करता येईल ते संवेदनशील असणाऱ्या महाराष्ट्र सरकारने करावे अशी विनंती सुहास खंडागळे यांनी केली आहे.