वाहतुकीचा प्रश्न सुटला पण बाजारपेठांचे काय?

आंबा बागेतदारांसमोर नवे संकट, हापूस काढणी पुढे ढकलली

रत्नागिरी:- आंबा बागायतदार, व्यवसायिकांना मुंबईत हापूस पाठविण्यासाठी वाहतूकीला परवानगी मिळाल्याने ‘कोरोना’च्या संकटात मोठा दिलासा मिळाला. मात्र अजूनही येथील आंबा बागायतदारांच्या मनात बाजारपेठा खुली होण्यासमोरील चिंता कायम आहे. वाहतूक परवाना मिळतोय म्हणून हापूस ची काढणी करू नका तर मुंबई वाशी येथील व्यापारी वर्गाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा अशीही चर्चा रत्नागिरीतील आंबा बागायतदारांमध्ये सुरू झाली आहे.

‘कोरोना’ने सारे जनजीवन प्रभावित झालेले असताना कोकणातील हापूस आंबा बागायतदारही पुरता हवालदिल झालेला आहे. देशातून होणारी विमानसेवा बंद झाली असून राज्यांच्या सीमा देखील सील केल्या जात आहेत. फळमार्केटची स्थितीही बंदसारखीच असल्याने त्याचा मोठा फटका आंबा बागायतदारांना बसणार आहे. आताच आंबा निर्यातीला प्रारंभ झाला असताना ‘कोरोना’ संकटामुळे तयार होऊ घातलेल्या हापूसचे करायचे काय? अशा मोठ्या विवंचनेत बागायतदार पडले आहेत.

आंबा वाहतूकीचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावर बैठक झाली. त्यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक, तालुका कृषी अधिकाऱयांच्या माध्यमातून ही वाहतूक होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे येथील आंबा बागायतदारांना, व्यवसायिकांना मोठा दिलासा मिळाला. वाशी (मुंबई) येथील बाजार समितीकडूनही प्रतिदिन 200 ट्रक आंबा कोकणातून विकत घेण्याची तयारी दर्शवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

आंबा बागायतदारांना वाहतूक परवानगीचा अर्ज व्हाट्स अँप वरही करता येणार आहे. बागायतदार यांनी आपला गाडी नंबर, कोठून कोठे जाणार, चालकाचे नाव, लायसेन्स आदी माहिती अर्जात भरण आवश्यक आहे. अडचण आल्यास संबधित जिल्हा कृषी अधिक्षक जगताप (9420008001), तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे (9405837380), के. व्ही. बापट (9422465828) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. त्यामुळे शुकवारी परवाना घेण्यासाठी येथील अनेक बागायतदारांनी कृषी कार्यालयात धाव घेतली.

मात्र बागायतदारांमध्ये आता वेगळीच चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी आता हापूस काढणीयोग्य बनलेला आहे. त्यामुळे वाहतूक परवाना मिळण्याची अडचण दूर झाल्याने आता हापूसच्या तोडणीला वेग येणार आहे. तरीही अजून बाजारपेठांची दारे खुली झालेली नाहीत. बाजारपेठांमध्ये जीवनावश्यक वस्तू, भाजी वगळता अन्य व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हापूसची तोडणी करण्यापूर्वी बागायतदारांनी आपापल्या दलालांशी बोलून घ्या, मगच पुढील निर्णय घ्या अशीही चर्चा येथील बागायतदारांमध्ये केली जात आहे.

यामध्ये विशेषकरून छोटे बागायतदार भरडण्याची दाट शक्यता आहे. कारण जर मार्केट खुले झाले तरच हापूस घेण्याची तयारी तेथील व्यापारी वर्गाने दर्शवली आहे. पण अजूनही मार्केट बंद असल्यामुळे बागायतदारांनी तोडणी करू नका असे बागायतदारांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे तयार होणाऱया हापूसच्या काढणीसमोरही पश्न उभा ठाकरणार आहे. जर व्यापाऱयांनी नकार दिला तर हापूस बागायतदारांनाच विकण्याची वेळ येईल अशी भिती सतावत असल्याने सावध पवित्रा घेतला जात आहे.