रत्नागिरी:- जिल्हयात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 700 इतकी असून जिल्हा शासकीय रुग्णालयात आज एकाला नव्याने निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था संघटनांचे एकत्रित संघटन असणाऱ्या हेल्पींग हॅन्डसच्या वतीने संपूर्ण रत्नागिरी शहरात घरपोच किराणा साहित्य पोहचविण्यासाठी 64 दुकानदारांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे मिरकरवाड्यापासून कुवांरबाव आणि रेल्वेस्टेशन पर्यंतच्या नागरिकांना लॉकडाऊन दरम्यान घरपोच धान्य पुरवण्यात येणार आहे.
याच प्रकारची घरपोच अन्न धान्य पुरवठा व्यवस्था राजापूर, लांजा, मालंगुड, दापोली, सांडे लागवण, पानवळ, निवळी, टेंभ्ये, मंडणगड, गुहागर आदि ठिकाणी सुरु करण्यात आली आहे. घरपोच धान्य सुविधेसाठी अत्यावश्यक मागणी नोंदवावी, अनावश्यक साठा टाळावा आणि शक्यतो e-payment चा वापर केला जावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवा आणि लॉकडाऊन मधून वगळण्यात आलेल्या इतर वाहतूकीची साधने यासाठी तहसीलदारांमार्फत परवाने जारी करण्यात आले आहे. या सर्वांसाठी जिल्हास्तवरावर नोडल अधिकारी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हयात 144 अंतर्गत आधीचे 4 आणि नव्याने 1 असे एकूण 5 प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. जिल्हयातील आंबा बागायतदार, फळबाज्या आणि दुध विक्री करणाऱ्या एकूण ८९३ जणांना परवाने आज देण्यात आले. त्यामध्ये आंबा बागायतदाराना ७९०, फळभाज्या व्यावसायिकांना ९८ आणि दुध व्यावसायिकांना ५ परवाने देण्यात आले आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.