जिल्हाधिकाऱ्यांकडून दुचाकी बंदी; अमलबजावणीसाठी पोलीस अधीक्षक उतरले मैदानात.

रत्नागिरी:-जगात धुमाकूळ होणाऱ्या कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संचारबंदी केले आहे. जिल्ह्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू होती.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्ह्यात दुचाकी वर बंदी घालण्यात आलेली नव्हती. परंतु गेले दोन दिवस शहरासह जिल्ह्यात दुचाकीस्वारांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याने अखेर जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दुचाकी वापरावर बंदी घातली आहे तर शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून दुचाकीस्वारांवर कारवाई केली.त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकींच्या संख्येत सायंकाळनंतर मोठी घट झाली होती.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरूवातीला राज्य सरकारने व त्यानंतर केंद्र सरकारने दि.१४ एप्रिल देशात संचारबंदी लागू केली आहे, परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी जीवनावश्यक वस्तूची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. किराणा मालासह दूध , भाजी, औषधे नागरिकांना उपलब्ध आहेत. याच वस्तूच्या खरेदीचे कारण देऊन दुचाकीस्वार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने नाईलाजाने जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात दुचाकीवर बंदी घालावी लागली.तसे आदेश शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्हाधिकारी दुचाकीवर बंदी घातल्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी स्वतः रस्त्यावर उतरत दुचाकीस्वारांवर कारवाई केली. तर यावेळी कोणते कारण नसताना चार चाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहनचालकांवर ही कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठीच नागरिकांनी बाहेर यावे.यावेळी केवळ एकाच व्यक्तीने बाहेर पडावे. मुख्य बाजारपेठेत जाण्यापेक्षा घरा जवळच्या दुकानातून साहित्य खरेदी करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक डॉ मुंढे यांनी केले आहे. सध्याची संचारबंदी नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या जीवाची काळजी घेत घरी थांबावे, पोलिसांना सहकार्य करावे असे आव्हान डॉ.मुंढे यांनी केले आहे.