०८ मार्च नंतर पुणे मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचा सक्तीचा आदेश

रत्नागिरी:- जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून /घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर दंडनीय कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आदेशीत केले आहे.
मुंबई व पुणे यासारख्या मोठया शहरात कोरोना विषाणूमुळे (कोव्हीड-१९) संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या पासून अन्य इसमांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबई व पुणे शहरातून रत्नागिरी जिल्हयात आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात रत्नागिरी जिल्हयातील नागरीक आल्यास त्यामुळे स्थानिक नागरिकांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये मुंबई व पुणे शहरातून 08 मार्च 2020 नंतर आलेल्या व्यक्तींना राहत्या ठिकाणातून/घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्याबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांनी आदेश जारी केला आहे.
आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 व कलम 56 व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम 2020 खाली दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे.