निमशहरी भागात बँकांची टपाल सेवा बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर जिल्हाधिकारी यांनी तोडगा काढावा- सुहास खंडागळे

टपाल सेवा बंद असल्याने नागरिकांचे चेक जमा करून घेण्यास बँकांचा नकार, खंडागळे यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र

संगमेश्वर:- ग्रामीण /निमशहरी भागातील बँकांचे टपाल सेवा बंद असल्याने चेक जमा करून घेतले जात नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण यावर तोडगा काढावा अशी लेखी विनंती गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये खंडागळे यांनी म्हटले आहे की,लॉकडाऊन च्या काळात बँकांचे व्यवहार सुरू राहतील असे राज्याचे मुख्यमंत्री यांनी वारंवार सांगितले आहे.

बँका त्यांच्या पद्धतीने सेवा देतही आहेत मात्र टपाल सेवा बंद असल्याचे कारण सांगून चेक जमा करून घेण्यास नकार दिला जात आहे.परिणामी जांचे बँक व्यवहार चेकचे आहेत त्यांना आर्थिक भुर्दंड काही काळ सोसावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुढील 21 दिवस चेक व्यवहार टपाल सेवा बंद असल्याने जमा करून घेतले जाणार नाहीत असे सांगितले जात आहे. सर्वच नागरिकांचे व्यवहार हे रोख रकमेचे किंवा डिजिटल नाहीत.
अनेक नागरिकांचे आजही व्यवहार हे चेकने होत असतात.संचारबंदी लागू होण्या आधी नागरिक,व्यापारी,छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिक यांनी पुढील तारखेचे आगाऊ चेक घेतलेले असतात.
मात्र हे चेक ग्रामीण व निमशहरी भागातील बँका सध्या स्वीकारत नसून 21 दिवसानंतर चेक स्वीकारले जातील असे सांगितले जात आहे.टपाल सेवा बंद असल्याचे सांगून चेक जमा करणे नाकारले जात आहे.यामुळे नागरिकांची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे खंडागळे यांनी पत्रात म्हटले आहे.
चेक जमा करून घेतले जात नसल्याने अकाउंट ला पैसेच जमा झाले नाहीत तर या अडचणीच्या काळात आर्थिक व्यवहार कसे करायचे हा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण होऊ शकतो असेही खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन यावर तोडगा काढावा,ग्रामीण भागातील बँकांचे टपाल बँकांच्या जिल्हा मुख्यालय येथे पोहचण्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी विनंती सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.