दिलासादायक! कोरोना संशयित 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह

189



रत्नागिरी:-
कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यातून 34 नमुने पाठविण्यात आले होते. यापैकी 2 नमुने रिजेक्ट झाले. 21 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 10 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा रुग्णालयात 11 जण निगराणीखाली आहेत तर जिल्ह्यात 639 जणांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे.
 कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक हालचालीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.जिल्हयातील ज्या कंपन्याच्या आस्थापना पूर्णपणे बंद आहेत, त्या कंपन्यामध्ये फक्त सुरक्षा, विद्युत व देखभालीसाठी कर्मचारी ठेवण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु सदर कर्मचारी कंपनी आवारात राहतील इतरत्र कोठे जाणार या अटीच्या आधीन राहून वरील मुभा देण्यात आली आहे .
जिल्हा रुग्णालयात 5 व्हेंटीलेटर्स उपलब्ध असून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात 4 आणि कामथे उपजिल्हा रुग्णालयात 1 असे एकूण 10 व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. जिल्हयात सिव्हील हॉस्पीटल येथे  11 जण निगराणीखाली आहेत. तर 639 जणांना होम कॉरंटाईन करण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तू लोकांना होम डिलीव्हरी द्वारे देण्यासाठी अनेकांनी पुढाकार  घेऊन प्रशासनास सहकार्य केले आहे. स्वंयसेवी संस्था व संघटना यासाठी पुढे आल्या असून  त्यांना नियोजनबध्दरित्या काम आखून दिले जाणार आहे. 21 दिवसांच्या कालावधीत खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवून नेहमीप्रमाणे रुग्णांची तपासणी सुरु ठेवावी असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पुण्या-मुंबईहून 08 मार्च 2020 पासून नंतरच्या काळात रत्नागिरी जिल्हयात आलेल्या नागरिकांनी सक्तीने स्वत:च्या घरात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा भंग करण्यांवर दंडणीय कारवाई करण्यात येणार आहे. धान्य दुकानदारांनी अधिकचा साठा ठेवून साठबाजी करु नये तसेच धान्य साठयाबाबत दुकानाच्या दर्शन फलक लावणे सक्तीचे करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
जिल्हयात 144 अंतर्गत 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरीतील स्वयंसेवी संस्थांची आज जिल्हाधिकारी महोदयासोबत बैठक झाली. सदर बैठकीत झालेल्या निर्णयानुसर स्वयंसेवी संस्था अत्यावश्यक अन्नधान्य, भाजीपाला, औषधे इ. सामान नागरिकापर्यंत घरपोच करणार असून फक्त सदरचे दुकान हे त्या नागरिकांच्या घरापासून नजिकचे असणे गरजे आहे.