होम क्वॉरंटाईन रुग्णांची संख्या 565 वर 

120

रत्नागिरी:-

जिल्ह्यात होम क्वॉरंटाईन असलेल्यांची संख्या वाढून 565 झाली आहे. 23 जण जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली असून 15 संशयितांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड येथून आलेल्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली असून खबरदारी म्हणून जिल्ह्यातील 908 उद्योगांपैकी 897 उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत.

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हयात खाजगी प्रवासी वाहतुकीस निर्बंध घालण्यात आले आहेत.

 जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असणाऱ्यांची संख्या 23 असून आत्तापर्यंत 23 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. होम क्वॉरंटाईन मधील जिल्ह्याची एकूण संख्या 565 इतकी आहे.  यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड व मुंबई येथून येणाऱ्यांची यादी करण्यात येत आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी औद्योगिक क्षेत्र पूर्णत: 100 टक्के बंद करण्यात आले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे, झाडगाव, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, दापोली येथील औद्योगिक क्षेत्रातील एकूण 908 उद्योगांपैकी 897 उद्योग बंद करण्यात आले आहेत. केवळ 11 उद्योग तांत्रिक कारणास्तव तसेच आवश्यक सेवांशी संबंधित असल्याने सुरु आहेत.  22 उद्योगांनी अपरिहार्य कारणास्तव काम सुरु  ठेवण्याची परवानगी मागितली असून त्याबाबत  अत्यावश्यक सेवा व तांत्रिक अडचण लक्षात घेवून निर्देश देण्यात येणार आहेत. व्यापारी महासंघाच्या सहकार्यातून जिल्ह्यात शक्य तिथे घरीच किराणा सामान पुरविण्यात येणार आहे.  तसेच विशिष्ट वेळी ठरवून दुकाने उघडण्याची मुभा दिली जाणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली आहे.