काळजी घेतलीच पाहिजे…मात्र कोरोना भीतीने गावात येणारे जाणारे रस्ते, गावबंदीच्या नावाखाली अडवणे,खोदणे म्हणजे स्टंटच,असले स्टंट थांबवा अन्यथा इमर्जन्सी वेळी रस्ता सुरू करण्यातच वेळ निघून जाईल – सुहास खंडागळे

189

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेले नियम पाळा. आणि पुढील 21 दिवस घरात थांबा..! गावातील रस्ते अडविण्यासारखे स्टंट करायची गरज नाही!

प्रशासनाने या असल्या प्रकारांकडे वेळीच लक्ष द्यावे,अन्यथा प्रत्येक गावात चुकीची माहिती घेऊन गाव बंदीसाठी काहीजणां मध्ये स्पर्धाच लागेल… आणि इमर्जन्सी वेळी नेमके रस्ते बंद असतील!

गावातील घरे ही एकमेकांना लागून नसतात,गावात घरे प्रशस्त असतात त्यामुळे जे नागरिक मुंबई,पुणे,कोल्हापूर, सांगली येथून आले आहेत ते त्यांच्या घरात राहणार आहेत त्यांनी 14 दिवस घरात राहण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत.. आता जिल्हाबंदी असल्याने कुणीही बाहेरून येणार नाही…पूर्ण संचारबंदी असल्याने अन्य गावातील लोकही येण्याची शक्यता नाही.एकमेकांच्या संपर्कात न जाण्याचा पर्याय लोकांकडे आहे.संबंधित लोकां मध्ये कोण लक्षणे असणारा संशयित आल्यास त्याची माहिती आरोग्य विभागाला देता येऊ शकते…

परदेशातुन आलेल्या लोकांची माहिती जरूर गावातील लोकांनी तात्काळ आरोग्य विभागाला दिली पाहिजे! मात्र जिल्हाबंदी लागू असताना,सरकार कडक पावले टाकत असताना गावबंदीचे स्टंट हवेत कशाला?

नुकताच शिमगोत्सव पार पडला,तेव्हा हजारो मुंबईकर,पुणेकर,ठाणेकर,कोल्हापूर, सांगलीकर कोकणात आपल्या गावात येऊन गेले…हे गाव बंद करणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यायला हवे.

गावातले रस्ते अडवले म्हणून एखाद्या गावातल्या नागरिकाला बाहेरून यायचे असेल किंवा बाहेर जायचे असेल तर तो जंगलातून चालत ही जाईल, रस्त्याच्या बाजूने मोकळ्या जागेतून जाईल…रहदारी साठी असणारे रस्ते अडवून काय साध्य होणार? या प्रकारांनी सामान्यांना रात्री अपरात्री मात्र इमर्जन्सी असेल तेव्हा होईल अडचण होईल!

रस्ते अडविणे म्हणजे केवळ स्टंट असून गावातील रस्ते म्हणजे मुंबई,पुण्या सारखे हायवे नव्हेत हे लक्षात घ्यावे.

दुसरी बाब जर गावात मेडिकल इमर्जन्सी आली तर दगड वैगरे टाकून बंद केलेला रस्ता कसा खोलयाचा ?रात्री अपरात्री एखाद्या वृद्धाला हार्ट अटॅक किंवा अन्य कोणताही आजार झाला तर त्याने काय करायचे?तो रस्ता मोकळा करण्यास किती वेळ घालवायचा?याचा विचार गावबंदी च्या नावाखाली रस्ते अडवून ठेवणाऱ्यांनी करावा!

गाव बंदी करण्यासाठी रस्ते अडवू नका,तर मनात निर्धार करा…घरी बसण्याचा! सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्या पाळा!

परदेशात अडकलेल्या लोकांना भारतात आणण्यासाठी विमान पाठवली जातात…का तर ते आपले आहेत…मग मुंबई, पुण्यातील असणाऱ्या आपल्याच लोकांकडे संशयाने का बघायचे?त्यांच्याशी काही दिवस संपर्क टाळा!

सरकारने वारंवार जी काळजी घ्यायला सांगितली आहे ती घ्या आणि सुरक्षित रहा!

स्वतःला लोकांपासून दूर ठेवा! त्यांनाही तुमच्या पासून दूर रहायला सांगा!

गाव बंदी /रस्ते झाडे तोडून अडविणे यापेक्षा… स्वतःवर काही बंधने घालू आणि कोरोना वर मात करू!