..तर दूरपल्ल्याची वाहतूक बंद करणे विचाराधीन!

84

रत्नागिरी:- कोरोना वायरस प्रादुर्भाव रोखणे व त्याला अटकाव करणे आज अत्यंत आवश्यक झाले आहे. कोरोना व्हायरसचा उद्रेक होवू नये यासाठी पुढील पाच दिवसांनतर शासकीय तसेच खाजगी बस सेवा बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन आहे. तरी ज्या नागकिांना महत्वाच्या ठिकाणी प्रवास करावयाचा आहे त्यांनी पुढील पाच दिवसात अगदी महत्वाचे/अतिमहात्वाचे काम असल्यासच करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरी जिल्हयातील जे नागरिक पुणे, मुंबईसारख्या इतर शहरामध्ये कामानिमित्त अथवा शैक्षणिक, पर्यटनासाठी गेलेले असतील ज्यांना जिथे येणे जाणे करावयाचे असेल त्यांनी पुढील पाच दिवसात करावे. येथील नागरिकांनी देखील आपल्या नातेवाईकांना, मित्र मैत्रिणिना याबाबत अवगत करावे.
पुढील पाच दिवसानंतर मुंबई, पुणे इ. शहरातून येणाऱ्या अथवा जाणाऱ्या शासकीय, खाजगी बस सेवा बंद करण्याचे जिल्हा प्रशासनाच्या विचारधीन आहे, याबाबत नागरिकांनी नोंद घ्यावी. प्रतिबंध हाच मार्ग असल्याने या विषाणूचा प्रसार रोखणे आवश्यक झाले आहे, यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी जिल्हयातून नियमीत मुंबई-गोवा व इतर लांब पल्ल्याच्या रेल्वे सुध्दा रद्द करण्याबाबत शासनास प्रस्ताव पाठविण्यात येत आहे.
०००