उक्षी खाडी पट्ट्यातील बावनदी पात्रात साचलेला गाळ उपसा करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्या!-सुहास खंडागळे

53

देवरुख:- उक्षी खाडी पट्ट्यात बावनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने या परिसरात उद्भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी व लवकरात लवकर गाळ उपसा करण्यात यावा या मागणीसाठी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याची माहिती संघटनेचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी दिली आहे.
उक्षी खाडी भागात बावनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने आजूबाजूला असणाऱ्या गावांना संभावणारा धोका व गाळ उपसला गेला नसल्याने नदी पात्रात पाणी क्षमता कमी झाल्याने याबाबत उपाययोजना करण्यासाठी व नदीपात्रातील गाळ उपसा लवकरात लवकर करण्यात यावा या मागणीसाठी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेचे शिष्ट मंडळ रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे. देवरुख येथे पार पडलेल्या संघटनेच्या कोअर कमिटी बैठकीत याबाबत रविवारी निर्णय घेण्यात आला.उक्षी भागात बावनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून काही ठिकाणी या साचलेल्या गाळामुळे नदीपात्र भरले आहे.गाळ उपसा न झाल्याने याभागात नदी पात्रात पाणी देखील कमी झाले असून याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे.एकंदरीत प्रश्न लक्षात घेऊन याबाबत आवाज उठविण्याचा निर्णय गाव विकास समितीने घेतला असून याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर प्रश्नाचे गांभीर्य जिल्हाधिकारी यांच्या कानावर घातले जाणार असल्याचे गाव विकास समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.देवरुख येथे पार पडलेल्या संघटनेच्या कोअर कमिटी बैठकीला गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड,कोअर कमिटी सदस्य मनोज घुग,अमित गमरे,सौ दिक्षा खंडागळे गीते, सौ अनघा कांगणे, विशाल धुमक, प्रशांत घुग ,डॉ.मंगेश कांगणे आदी उपस्थित होते.