नव्या दशकाकडे वाटचाल करताना आधुनिकतेची कास धरत भारताला नवभारताकडे नेणारा हा सुधारणावादी अर्थसंकल्प आहे. याचे मी मनापासून स्वागत करतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
शेती आणि शेतकर्यांच्या समस्यांवर मुळापासून उपचाराचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आणि कृषी विकासातील अडथळे दूर करण्यासाठी उत्पादन, कृषी मालाची वाहतूक, बाजारपेठ, निर्यात अशा सर्वच बाबतीत ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. असेही फडणवीस म्हणाले.
किसान रेल आणि कृषी उडान यासारखे निर्णय ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. शेतकरी कल्याणासाठी सुधारणावादी कायदे स्वीकारणार्या राज्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा मनोदय या नवदशकातील अर्थसंकल्पातून स्पष्टपणे अधोरेखित होतो. सिंचन आणि ग्रामीण विकासासाठी 2.83 लाख कोटी रुपयांची तरतूद हा ग्रामोदयाचा मार्ग अधिक सुकर आणि गतिमान करणारा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अनुसूचित जातीसाठी 85,000 कोटी रुपये, अनुसूचित जमातीसाठी 53,700 कोटी रुपयांची तरतूद विविध कल्याणकारी योजनांसाठी करण्यात आली आहे. महिलांसाठी 28,600 कोटी रुपये, पोषण आहारासाठी 35,600 कोटी रुपये, ’सर्वांसाठी घरे’ हे अभियान पुढे सुरु ठेवण्यासाठी सवलती कायम ठेवून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी सर्वसमावेशकतेचा अजेंडा पुन्हा अधोरेखित केला आहे. सुप्रशासनातून सर्वांना सुखी आणि आनंददायी जीवन सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ’सर्वजनहिताय- सर्वजनसुखाय’ हे ब्रिद प्रत्यक्षात साकारणारा हा अर्थसंकल्प आहे. वैयक्तिक प्राप्तीकरांच्या दरात कपात आणि नवे स्लॅब निर्माण करून मध्यमवर्गीयांना तर मोठाच दिलासा या अर्थसंकल्पाने दिला आहे. त्यामुळे हा खर्या अर्थाने जन-जनांचा अर्थसंकल्प आहे. अंत्योदयाचे सूत्र आणखी पुढे नेताना प्रत्येक आकांक्षित जिल्ह्यात रुग्णालये, जिल्हास्थानी वैद्यकीय महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इंटर्नशिपची संधी, नवीन नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी यातून रोजगारनिर्मिती सुलभ होणार आहे. विकासयात्रेला आणखी तळागाळापर्यंत नेणारा हा अर्थसंकल्प आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जिल्हास्थानी एक्सपोर्ट हब, मुंबई- दिल्ली एक्सप्रेसवे, मुंबई-अहमदाबाद रेल्वे प्रकल्प, नव्या रेल्वे, पोर्ट, 100 नवे विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पातून भारताच्या आर्थिक विकासाचा अध्याय नव्याने लिहिला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.