पारंपारिक मच्छीमारांना भाजपचा पाठिंबा.

पारंपरिक मच्छीमारांना भाजपचा पूर्ण पाठिंबा आहे. बेकायदा एलईडी लाईटद्वारा मच्छीमारी करणार्‍यांना शासनाने पाठिशी घातल्याने पारंपरिक मच्छीमार अडचणीत आले आहेत. माजी मुख्यमंत्र्यांनी या संदर्भाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची व्यवस्था नव्या सरकारने केली पाहिजे. पारंपरिक मच्छिमारांचे प्रश्‍न वरिष्ठांपर्यंत नेऊ. गरज पडल्यास केंद्र शासनाची मदत घेऊन पारंपरिक मच्छीमारांच्या पाठिशी उभे राहू, अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त पारंपरिक मच्छीमार, रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले. त्यांची भेट घेतल्यावर अ‍ॅड. पटवर्धन यांनी मच्छीमारांच्या पाठिशी असल्याचे सांगितले.

नाटे येथील लिंगायतवाडी ग्रामस्थ जि. प. च्या बाहेर रस्त्याच्या प्रश्‍नाबाबत उपोषणाला बसले. याबाबत उपोषणकर्ते आणि प्रशासनात समन्वय साधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांनी 100 मीटर रस्ता मार्च 2020 पूर्वी करण्याचे लेखी आश्‍वासन मिळवले आणि उपोषणाची यशस्वी सांगता झाली.

रिक्षाचालकांना आरटीओ ऑफिसकडून दिली जाणारी वागणूक अन्यायकारक आहे. ऑनलाइन पैसे भरण्याची सक्ती, प्रक्रिया पूर्ण करताना त्रास दिला जातो. या विरोधात उपोषण करणार्‍या रिक्षाचालकांचीही भेटही अ‍ॅड. पटवर्धन यांनी घेतली. प्रजासत्ताक दिनी उपोषण करायला लागावे, हे नवीन सरकारसाठी लांच्छनास्पद आहे. शासन, प्रशासनाने नागरिकांच्या प्रश्‍नांबाबत संवेदनशील राहावे, असे सांगत जिल्हा भाजप नागरिकांसोबत राहून प्रश्‍न सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका घेईल. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, सचिन करमरकर, बिपीन शिवलकर, विकी जैन, राजू भाटलेकर आदी उपस्थित होते.