कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप रत्नागिरीतही पूर्णतः यशस्वी.

वाजवी वेतनवाढ मिळावी व सेवा – शर्तीमध्ये सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी पुकारलेला बैंक कर्मचाऱ्यांचा आजचा संप पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी केला . आज व उद्या – ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी असा दाना दिवस करण्यात येणाऱ्या संपाचा आजचा पहिला दिवस होता . . बँकींग उद्योगातील शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नऊच्या नऊ संघटनांनी या संपामध्ये भाग घेतला होता . देशभरात सुमारे १० लाख तर महाराष्ट्र राज्यात जवळपास ४० हजार बक कर्मचारी व अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले होते . २७ महिने प्रलंबित असलेला बँक कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीचा ११वा द्विपक्ष करार त्वरीत संपन्न करा ही प्रमुख मागणी या संपात आयबीएकडे करण्यात आली आहे . संपाच्या एक दिवस आधी म्हणजे ३० जानेवारीला झालेल्या वाटाघाटीही निष्फळ ठरल्या . पुन्हा एकदा असमाधानकारक वेतनवाढीचा प्रस्ताव आयबीएने दिला आहे . त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांना नाईलाजाने हा संप करावा लागत आहे . वेतनवाढीच्या मागणीबरोबरच नवीन पेन्शन योजना रद्द करावी , सर्वांसाठी जुनी पेन्शन योजना चालू करावी , पाच दिवसांचा आठवडा करावा , पेन्शन अद्ययावत करणे , फॅमिली पेन्शनमध्ये सुधार , समान कामाचे समान वेतन या व इतरही मागण्या या संपात करण्यात आल्या आहेत , ज्या आयबीए मान्य करायला तयार नाही . या दोन दिवसांच्या संपानंतर जर आयबीएने पुढाकार घेऊन वेतनवाढीचा ११वा करार संपन्न केला नाही तर ११ ते १३ मार्च असा तीन दिवस व ०१ एप्रिल २०२० पासून बेमुदत संप करण्यात येईल असे संघटना प्रतिनिधींनी जाहीर केले . रत्नागिरीमध्ये संपकरी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी सकाळी बँक ऑफ महाराष्ट्रसमोर गाडीतळ येथे एकत्रित येऊन आपला संताप व्यक्त करणारी जोरदार निदर्शने केली . निदर्शनांचे नेतृत्व व संपकरी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन राजेंद्र गडवी , विनोद आठवले , विनोद कदम , विश्वनाथ आडारकर व संतोष कुलकर्णी यांनी केले .