मुंबई, पुण्यात राहूनच नव्हे तर रत्नागिरीतही राहून ‘जेईई’मध्ये (मेन्स) यश मिळवणे शक्य आहे, हे एकाच वेळी पात्र ठरलेल्या 14 विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाची ही पहिलीच तुकडी आहे. आता संस्थेच्या शाळांमध्ये आठवीपासून याची तयारी करून घेणार आहोत. संस्थेच्या चारही शाळांतील विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा महाविद्यालयाची अत्याधुनिक प्रयोगशाळाही दाखवण्याचा विचार आहे, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे यांनी केले.
राष्ट्रीय पातळीवरील आयआयटी आणि एनआयटी या अभियांत्रिकी संस्थेतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन्समध्ये यश मिळवणार्या विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. आज सायंकाळी राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. तुषार पडिये (98.99), आयुष धुळप (98.92) आणि श्रेया तळेकर, आदित्य मगदूम, दिपाली पटेल, अनुज नागवेकर, सुयोग कोकजे, साक्षी शिंदे, अथर्व कदम, रोहित जोशी, पूर्वा घाणेकर, प्रथमेश गोराड, गायत्री जाधव, अद्वय देसाई यांचा सत्कार केला.
माजी कार्याध्यक्ष रमेश कीर म्हणाले, कोकणातील हे एक ऐतिहासिक यश आहे. पालकांच्या चेहेर्यावर आनंद पाहत होतो. कोकणातील सर्वांत जुनी व मोठी संस्था विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षणासाठी उभी राहिल्याचे भान संस्थाचालकांना आहे. कोकण बोर्ड चालू झाल्यापासून सलग 8 वर्षे राज्यात अव्वल आहे. पण इथली मुले स्पर्धा परीक्षांतून पुढे जात नाहीत याची खंत होती. पण जेईईच्या निकालाने नक्कीच आयआयटीयन्स घडवू याची खात्री आहे. हा उपक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबवू.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी अशा बुद्धीमान विद्यार्थ्यांच्या बळावर भारत महासत्ता होणार असल्याचे सांगितले. हे यश सुनियोजित प्रयत्नांतून मिळाले आहे. यापुढेही भरपूर यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पालकांच्या वतीने डॉ. अभय धुळप यांनी मुंबईतील मित्रांच्या मुले आठवीपासून या परीक्षेची तयारी करत असल्याचे सांगितले. माझ्या मुलाला दहावीनंतर येथे संधी मिळाली. अनेक अडचणीतून वाट काढत हे केंद्र नक्कीच भरघोस यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थी तुषार पडिये याने मनोगत व्यक्त केले.
या वेळी व्यासपीठावर डॉ. मकरंद साखळकर, प्रा. विशाखा सकपाळ, राजन मलुष्टे, वैद्य रघुवीर भिडे, मनोज पाटणकर, प्रा. उरुणकर, प्रा. चिंतामणी दामले आणि स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख प्रा. महेश नाईक उपस्थित होते.