रत्नागिरी:- राज्यात सन 2017 पासून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. ही प्रलंबित शिक्षकभरती पूर्ण करावी, यासाठी राज्यातील डीएड्, बीएड् अभियोग्यताधारकांनी पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले. 2017 च्या भरतीविषयी दिरंगाई न करता प्राधान्यक्रम देऊन निवड याद्या लावाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षक भरतीसाठी राज्यात सन 2017 साली अभियोग्यता चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यातील पहिल्या यादीतील उमेदवार रूजू होऊन 3 वर्षांचा
शिक्षणसेवक कालावधी पूर्णही केला. मात्र उर्वरित निवड याद्या अद्याप जाहीरकरण्यात आलेल्या नाहीत. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये नव्याने परीक्षा घेत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या शिक्षक भरतीची वाट पाहणार्यांतून संताप व्यक्त होत आहे.
2017 च्या शिक्षक भरतीतील रिक्त जागा, अपात्र उमेदवार, गैरहजर उमेदवार यांच्या रिक्त जागा याच भरतीत भरण्यात याव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या जागा भरण्यासाठी 19 एप्रिल 2023 रोजी शासनाने परवानगी दिली आहे.
माजी सैनिकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी 12 जून 2023 रोजी परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती आयुक्त कार्यालयाकडे जमा आहे. 4 ते 17 जुलै 2022 दरम्यान धरणे आंदोलन केल्यानंतर 17 जुलैला राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्यासोबत अभियोग्यताधारकांची बैठक झाली होती.
शिक्षण आयुक्तांच्या बैठकीनंतर तीन महिने होत आले तरीही प्रलंबित शिक्षक भरतीविषयी काहीच कार्यवाही दिसून आली नसल्याने या शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. शिक्षण आयुक्तांसोबत बैठक लावण्यासाठी वारंवार प्रयत्न करून, निवेदन देऊनही बैठक लावण्यात आलेली नाही. त्यामुळे अभियोग्यताधारक नवनाथ केजभट, गजानन बहिवाळ, लक्ष्मण सोळंके यांच्यासह राज्यातील अभियोग्यताधारकांनी उपोषण केले. आयुक्त कार्यालयातील प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी कार्यवाही सुरू असल्याबाबतचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
तीन दिवस आम्ही शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केले. सहा वर्षे शिक्षकभरती प्रक्रियाच पूर्ण केली जात नाही. ही प्रक्रिया पूर्ण होणार कधी? असा सवाल उपोषणकर्ते गजानन बहिवाळ यांनी केला आहे.