नवी दिल्ली:- लहान मुलांच्या लसीकरणावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी बुधवारपासून लसीकरण सुरू होणार आहे.
लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. भारतात मागील वर्षी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला होता. आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा मिळालेले कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस देण्यात येणार होता. त्याशिवाय, आजारांनीग्रस्त असलेल्या 60 वर्षावर नागरिकांना बुस्टर डोस घेण्याची मुभा देण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली आहे. या वयोगटातील मुलांचे लसीकरण बुधवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर, 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येणार आहे. याआधी 60 वर्षावरील व्यक्तींना बुस्टर डोस घेण्यासाठी असलेले नियम शिथील करण्यात आले आहेत. कोरोनाविरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम सुरु आहे. कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासात 4 लाख 61 हजार 318 कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोरोना लसीचे एकूण 180 कोटी 19 लाख 45 हजार 779 डोस देण्यात आले आहेत.