11 दिवसात 1 हजार 239 गावे झाली पुन्हा प्रकाशमान

रत्नागिरी:- तौक्ते वादळाच्या तडाख्यात जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील 1 हजार 239 गावे काळोखात होती; मात्र महावितरण कंपनीने अन्य जिल्ह्यातील पथकांच्या मतदीने 11 दिवसांमध्ये युद्धपातळीवर काम करून सर्वच्या सर्व म्हणजे 1 हजार 239 गावे पुन्हा प्रकाशमय केली आहेत. 5 लाख 54 हजार 921 ग्राहकांपैकी 654 ग्राहक अजून अंधारत आहेत. उर्वरित जिल्ह्यातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात कंपनीला यश आले आहे. 

या वादळामध्ये महावितरण कंपनीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे किनारी भागातील 1 हजार 239 गावे अंधारात गेली होती. कंपनीने दुसर्‍या दिवसापासून लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. अन्य जिल्ह्यातील महावितरणच्या पथकांना पाचारण करण्यात आले. स्थानिकांच्या मदतीचा आधार घेत मोठ्या शर्थीने कंपनीने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम सुरू केले. ग्रामीण भागात हे  काम करताना त्यांना अनेक अडचणी आल्या; मात्र त्यावर मात करीत विद्युत खांब उभे केले, मुख्य वाहिन्या जोडल्या, ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केले, अशी अनेक कामे करून ग्राहकांचा लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करण्यावर भर दिला आहे. विद्युत खांब उभारण्यास अडथळा येत आहे तिथे सर्व्हिस वायरने जोडण्या दिल्या. दुसर्‍या रोहित्रावरून विद्युत पुरवठा केला.

जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत बाधित झालेल्या 1 हजार 239 गावांपैकी सर्वच्या सर्व गावांमध्ये पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला. 55 च्या 55 उपकेंद्रे सुरू केली. 7 हजार 548 रोहित्रापैकी 7 हजार 547 सुरू झाले. फक्त एक रोहित्र बंद आहे. उच्च दाबाचे 519 खांब बाधित झाले होते. त्यापैकी 454 उभे करण्यात आले आहेत. अजून 65 खांब पडले आहेत. लघुदाबाचे 1 हजार 410 खांब बाधित होते. त्यापैकी 1 हजार 72 खांब उभे केले असून 338 खांब अजून पडलेले आहेत.