108 रुग्णवाहिकेत महिलेची सुखरूप प्रसूती

रत्नागिरी:- आरोग्य विभागाची 108 रुग्णवाहिका रुग्णांसाठी खूप महत्त्वाची ठरत असून नुकतेच 108 रुग्णवाहिकेत गरोदर मातेला उपचारासाठी रत्नागिरीत दाखल करत असताना वाटेतच रत्नागिरी शहरापासून काही अंतरावर प्रसुती झाली. डॉ. अनिकेत डिके यांनी प्रसंगावधान राखत सुखरूप प्रस्तुती केली.

संगमेश्वर 108 रुग्णवाहिकेला शुकवारी रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी फोन आला की, संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथून पेशंट निधी प्रशांत तांबे अवघडलेल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच संगमेश्वर 108 रुग्णवाहिका डॉ. अनिकेत डिके यांनी पेशंटच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली आणि विलंब न लावता पेशंट निधी तांबे यांना रूग्णवाहिकेत घेऊन रत्नागिरीच्या दिशेने जाण्यास निघाले असताना, रत्नागिरीपासून काही अंतरावर गेल्यावर सदर महिलेस प्रसुती कळा चालू झाल्या कुवारबाव येथे रुग्णवाहिका पोचली असता या महिलेस तीव्र प्रसुती कळा चालू झाल्यामुळे डॉ. अनिकेत डिके यांनी सहाय्यक गणेश पाथरे यांना रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजुला थांबविण्यास सांगितले आणि रस्त्यातच प्रसुती करण्याचे ठरविले आणि काही मिनिटांमध्ये सुखरूप प्रसुती झाली निधी यांनी एका गोड अशा पुत्राला जन्म दिला असून बाळ आणि बाळाची आई यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, दोघंही सुखरूप आहेत. नातेवाईकांनी डॉ. डिके व सहाय्यक गणेश पाथरे तसेच 108 टीमचे आभार मानले.