108 रुग्णवाहिकेचे चालक ठरले देवदूत; 19 हजार रुग्णांना केले रुग्णालयात दाखल 

रत्नागिरीः– जिल्ह्यात कोरोनाची महामारी सुरु आहे. प्रत्येकजण कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात बसला आहे. अशा स्थितीत कोरोना बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार व्हावेत यासाठी रुग्ण वाहिका चालक धडपडत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांसोबतचा त्यांचा प्रवास स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करणारा आहे. तरीहि रुग्णवाहिका चालक धोका पत्करुन रुग्णांना रुग्णालयात पोहोचवित आहे. १०८ वरील चाळीस चालकांनी तब्बल १९ हजार ८६ रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. या कोरोना योध्दांचे योगदान समाजासाठी महत्वपूर्ण आहे.

महाराष्ट्र शासन व बी. व्ही. जी इंडिया कंपनीच्या संयुक्त विद्यमानाने सन २०१४ पासून १०८ ही रुग्णवाहिकेची सेवा सुरु झाली. जिल्ह्यातील विविध भागात १७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यावर काही ४० चालक, २५ डॉक्टर अहोरात्र काम करीत आहेत. यापुर्वी आजारी, ह्दयविकार, प्रसूती, सर्पदंश या सारख्या रुग्णांना वाचविण्यात या रुग्णवाहिकेचे महत्वपूर्ण योगदान होते. परंतु आज कोरोना काळात हीच रुग्णवाहिका रुग्णालय व रुग्ण यांच्यातील दुवा बनली आहे. 

रुग्णवाहिका चालक हा तर सर्वसामान्य कुटुंबातला. कुटुंबाची गुजरण व्हावी यासाठी अल्प मोबदल्यात रुग्णवाहिकेवर काम करतात. परंतु आज कोरोनाच्या महामारीत हाच रुग्णवाहिका चालक सर्वसामान्यासाठी देवदूत ठरला आहे. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण असल्याचा कॉल मिळताच तत्काळ त्याचक्षणी तेथे पोहोचतो. आज रुग्णवाहिका चालकाची वाट पहात रुग्ण उभे असतात. रुग्णवाहिका चालकाच्या रुपाने देवच मदतीला आल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे.