100 एकरवर उभा राहणार ग्लोबल व्हिलेज प्रकल्प

रत्नागिरी :-  जिल्ह्यात पर्यटनाला वेगळा आयाम देण्यासाठी तालुक्यातील आरे-वारे येथे 15 हेक्टर जागेवर प्राणिसंग्रहालय उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. सुमारे 50 कोटीचा हा प्रकल्प असून दोन वर्षांचे हे काम आहे. पहिले बर्ड पार्क, मोठे अ‍ॅक्वेरिअम, स्नेक पार्क नंतर प्राणिसंग्रहालय बांधण्यात येणार आहे. एवढेच नाही, तर संपूर्ण भारताचे प्रतिबिंब दिसेल असे 100 एकरावर ग्लोबल व्हिलेज  साकारण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. प्राणिसंग्रहालय मिर्‍या येथे होणार होते. मात्र त्यासाठी लागणारी जागा तिथे उपलब्ध झाली नाही. म्हणून वन विभागाच्या नावे असलेल्या जमिनीचा उपयोग करून 15 हेक्टर जागा आरे-वारे येथे उपलब्ध झाली आहे. तेथेच भव्य प्राणिसंग्रहालय उभारण्याचे निश्‍चित झाले आहे. सुमारे 50 कोटीचा हा प्रकल्प आहे. त्यासाठी अनेक परवानग्या महत्त्वाच्या आहे. केंद्राचा, पर्यावरणाची आणि राज्य शासनाची परवानगी लागते. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन ते तीन वर्षांचा हा प्रकल्प आहे. मात्र सुरवातीला पक्षी पार्क (बर्ड पार्क), मोठा अ‍ॅक्वेरिअम असले. त्यामध्ये छोट्या कांटा माशांपासून मोठ्या आणि रंगीत माशांचा समावेश असले. त्यानंतर स्नेक पार्क उभारण्यात येणार आहे. यामध्ये धामण, अजगर जातीच्या सापासह सर्व प्रकारच्या जातीचे साप असतील. नंतर कोणते प्राणी ठेवायचे यावर निर्णय होईल.

सागरी संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. मार्चपर्यंत तारांगण सुरू होईल, गोव्याच्या धर्तीवर बीच शॅक्स, बीचवर लेझर शो, असे पर्यटन वाढीसाठी अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. ग्लोबल व्हिलेजच्या माध्यमातून संपूर्ण देशाचे प्रतिबिंब 100 एकर जागेत दिसेल असा प्रकल्प उभारण्याचा माझा प्रयत्न आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत कोरोना आटोक्यात आला तर पुढील तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात अमुलाग्र बदल होईल. एवढे प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. काही कोटीत रक्कम जिल्ह्याला मिळेल, अशी मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.