मासेमारी बंद ठेवण्याचे आवाहन; भात पेरण्यांचा खोळंबा
रत्नागिरी:- भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त संदेशानुसार 8 ते 10 जून या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र, गोवा किनार्यावर पूर्व मध्य अरबी समुद्राच्या ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्यासह पावसाची देखील शक्यता आहे. मच्छीमारानी या कालावधीत समुद्रात मासेमारीसाठी जावू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती; मात्र कालांतराने वार्यांचा वेग मंदावल्यामुळे केरळमध्येच मोसमी पाऊस उशिरा दाखल झाला. त्याचा पुढील प्रवास लांबल्यामुळे कोकणात पावसाची प्रतिक्षाच आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास अचानक वेगवान वार्यासह रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील काही भागांमध्ये हजेरी लावली होती; मात्र वार्यामुळे पाऊस स्थिरावला नाही. विजांचा कडकडाटही पहायला मिळाला. हा जोर काही काळासाठीच होता. मंगळवारीही (ता. 8) दिवसभर पावसाची चिन्हे नव्हती. सायंकाळी हलका वारा आणि ढगाळ वातावरण होते. कुलाबा वेधशाळेने पुढील दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हा संदेश बळीराजासाठी दिलासा देणारा ठरणारा आहे. पावसाअभावी भात पिकाच्या पेरण्या रखडल्या आहेत. जुनच्या पहिल्या आठवड्यात मोसमीपुर्व पावसाचे आगमन झालेले नसल्याने पेरण्यांची कामे सुरु करण्यात अडथळे आले आहेत. काहीठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन शेतकर्यांनी पेरण्या केल्या आहेत. दिवसभर कडकडीत उन पडत असल्यामुळे त्या पेरण्या वाया जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.