10 जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन दुकाने उघडण्यास परवानगी द्या

व्यापारी महासंघाची प्रशासनाकडे मागणी 

रत्नागिरी:- गेले 2 महिने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन फार मोठे नुकसान सहन केले आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळण्याची आशा नाही. आता मात्र व्यापाऱ्यांना नुकसान सहन करणे शक्य नाही. आतापर्यंत प्रशासनाला लॉकडाउनल व्यापाऱ्यांनी सहकार्य केले. राज्यात आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मात्र जिल्ह्यामध्ये 9 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. 10 जूनपासून मात्र आपणाकडून व्यापाऱ्यांना शिथिलता मिळणे आवश्यक आहे. सर्व नियमपाळून सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्या, अशी मागणी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे  यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिल्ह्यामध्ये गेले 2 महिने कोविड 19 (कोरोना) चा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनामार्फत लॉकडाऊन जाहीर करण्यात केले आहे. जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्याचे पालन करत व प्रशासनाला सहकार्य करत रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. तरी देखील जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेऊन कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत नाही हे ह्यावरून दिसून येते. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात न येण्यामागील कारणे प्रशासनाने अभ्यास करून शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी यापुढे व्यापाऱ्यांना वेठीस धरले जाऊ नये. या 2 महिन्यातील लॉकडाऊन च्या काळात व्यापाऱ्यांना येणारी विजबिले, निरनिराळे कर, कामगारांचे पगार व खर्च थांबलेले नाहीत. त्यामुळे गेले 2 महिने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन फार मोठे नुकसान सहन केले आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्यांना शासनाकडून कोणतीही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आता मात्र व्यापाऱ्यांना नुकसान सहन करणे शक्य नाही. व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरू करून आपला चरितार्थ चालवणे भाग आहे.

राज्यात आजपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये 9 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे. व्यापारी आपल्याला 9 जूनपर्यंत सहकार्य करण्यास तयार आहेत. परंतु 10 जूनपासून आपणाकडून व्यापाऱ्यांना शिथिलता मिळणे आवश्यक आहे. तरी आपणास विनंती आहे की, 10 जूनपासून राज्यातील अनलॉक प्रक्रियेप्रमाणे रत्नागिरीमध्ये देखील सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी 5 ह्या वेळेमध्ये सुरू करण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाचे सर्व नियम व्यापाऱ्यांकडून पाळण्यात येतील. व्यापारी आपला व्यापार करताना सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझर व मास्क ह्या नियमांचे पालन करून करेल. आमच्या मागणीचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, ही पुनश्च विनंती , असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.