रत्नागिरी:- धुरांच्या रेषा हवेत काढणारी कोकण रेल्वे आता वीजेवर धावणार आहे. पर्यावरणपुरक इंधनावर धावणारे इंजिन रेल्वेला जोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कोकणाच्या कडाकपाऱ्यातून जाणारी कोकण रेल्वे वीजेवर धावू लागली आहे. रोहा ते वेरणा या मार्गावरील विद्युतिकरणाचे ८७ टक्के काम पुर्ण झाले आहे. यासाठी सुमारे १ हजार १०० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. भारतातील सर्वात मोठे रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम कोकण रेल्वे मार्गावर सुरु आहे. मागील वर्षी रोहा ते रत्नागिरी स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले. तर, कारवार ते ठोकूर येथील विद्युतीकरणाची कामे सुरु आहेत. उर्वरित रत्नागिरी ते कारवार या विभागातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. बोगद्यामधील विद्युत यंत्रणा, वे बल टाकणे व उर्वरित कामे सुरु आहेत. सध्या एकूण ८७ टक्के काम झाले असून फेब्रुवारीत हे काम पूर्ण होण्याचा आशावाद कोकण रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर या मार्गावरील सर्व गाड्या वीजेवरच धावणार आहेत.
कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अनेक ठिकाणी दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच, काही रेल्वे स्थानकादरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे. तसेच, या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे २०० कोटी रुपये वाचणार आहेत. सध्या डिझेलवर रेल्वेला ३०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, आता विजेवर गाड्या भावण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे. तसेच , प्रदूषण मुक्त प्रवास होणार आहे . विद्युतीकरणामुळे प्रदूषण टळणार आहे. त्यामुळे निसर्गाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.
कोकण रेल्वेचा मार्ग जंगलातून गेला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमुळे विद्युत प्रवाह खंडीत ( वायर ट्रिपिंग ) होण्याचे प्रकार होऊ शकतात. पुरवठा खंडीत झाला की गाडी १०० मीटरमध्ये जाऊन थांबते. अशी ठिकाणे निश्चित करुन तेथे आपत्कालीन यंत्रणा ठेवणे आवश्यक आहे. तर, दुसऱ्या बाजूला एखादे इंजिन निकामी झाले तर , पिगबॅक करायला बॅकअप डिझेल इंजिन तयार ठेवणे आवश्यक असल्याने यावर कोकण रेल्वे प्रशासनाकडून कामे सुरु आहेत.