1 एप्रिलपासून सर्व शेतकर्‍यांना वाढीव पीक कर्ज 

रत्नागिरी:- खते व बियाणे तसेच मशागतीचा खर्च यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे. त्यासाठी 1 एप्रिलपासून सर्व शेतकर्‍यांना वाढीव पीक कर्ज मिळणार असून याबाबतचा जिल्हा बँकर्स कमिटीच्या प्रस्तावाला राज्यस्तरीय बँकर्स समितीने मान्यता दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी अडचणीत आहेत. कोरोना अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती खालावली आहे. सध्या शेतकरी वर्गाच्या समस्या या बर्‍याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. तसेच वातावरणीय बदल यामुळे तर शेती करणे फारच जिकिरीचे होऊन बसले आहे. त्यातच महागाईने देखील शेतकर्‍यांना त्रस्त करण्याचे काम केले आहे. त्यासाठी बँकेच्या पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू होऊन त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

नवीन आर्थिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून तीन लाखांपर्यंत शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक भांडवल उपलब्ध होणार आहे. बँकांची थकबाकी देखील वाढणार नाही आणि त्यासोबत पुढे कर्जमाफीची गरज देखील भासणार नाही.