७० व्या नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धेत ललित कला भवन वरळी संगीत नाट्य मंडळाला द्वितीय पारितोषिक

रत्नागिरी:- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ (महाराष्ट्र शासन) मुंबई विभागातर्फे ७० वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा दि. ८ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये स्वातंत्रवीर सावरकर नाट्यगृह, कामगार कल्याण भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई येथे पार पडली. या स्पर्धेत एकूण २० संघांनी सहभाग घेऊन सदर स्पर्धेचे परीक्षण मा. श्री. नंदकुमार सावंत, मा. श्री. सुरेश खानविलकर, मा. श्रीमती नविनी कुलकर्णी यांनी केले.

सदर स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील कै. बाळ येसू बोरकर यांच्या आश्रयाखाली आणि ह. भ. प. वै. शरद (दादा) बोरकर यांच्या कृपाशीर्वादाने ललित कला भवन वरळी या मंडळाने सादर केलेल्या मी तर बुवा अर्थाच शहाणा या नाटकाला द्वितीय पारितोषिक सन्मानित करण्यात आले.

तसेच स्पर्धेत या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनय (पुरुष) द्वितीय क्रमांक प्रणय बोरकर, उत्तेजनार्थ ओमकार बोरकर, सर्वोत्कृष्ट अभिनय (महिला) तृतीय क्रमांक पुजा महाकाळ, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक दशरथ कीर, सर्वोत्कृष्ट नेपथ्य तृतीय क्रमांक प्रदीप पाटील, सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना द्वितीय क्रमांक संजय तोडणकर यांना वैयक्तिक बक्षीस मिळाले.

वरवडे गावातील मंडळ, सर्व कलाकार नोकरीसाठी मुंबई येथे राहून मागील १०७ वर्षे आपली नाटकाची परंपरा जपून ठेवत प्रथमच स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये द्वितीय पारितोषिक सहित वैयक्तिक सात बक्षिस पटकावली. सर्व स्तरावर या मंडळाचे आणि कलाकारांचे कौतुक होत आहे. या पुढे देखील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आमच मंडळ सहभाग घेणार असून अनेक नवीन कलाकार आमच्या कडून तयार होतील असे मंडळाचे सल्लागार श्री. निखिल बोरकर यांनी सांगितले.

सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ अध्यक्षपदी मा. श्री. अजित कुमार चौधरी (सहा. महाव्यवस्थापक व उप विभागीय व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र) तसेच प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रशांत निगडे (सिने नाट्य अभिनेते, लेखक, निर्माते, दिग्दर्शक) तर विशेष उपस्थिती मा. श्री. रविराज इळवे (कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. वरवडे सारख्या ग्रामीण भागातील कलाकारांनी मुंबई मध्ये कला सादर करून द्वितीय पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल रत्नागिरी मध्ये सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.