परत सेवेत घेणार ; मंत्री सामंतांचा पुढाकार
रत्नागिरी:- कोरोना महामारीच्या अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या ६२ नर्सिंग कॉलेच्या विद्यार्थिनींचा २ महिन्याचा पगार रखडला होता. आम्ही त्यांचा पगार तत्काळ काढण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी परीक्षेचे कारण दिले आहे. ज्या विद्यार्थिनींना परीक्षेसाठी जायचे आहे त्यांनी जावे. ज्या नर्सना परत सेवेत यायचे आहे त्या परत येऊ शकतात. त्यांना तशी ऑर्डर देण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण होता. संसर्ग वाढत असताना बाधितांना कोविड सेंटरही कमी पडत होती. त्या तुलनेत आरोग्य कर्मचारी कमी असल्याने या विभागावर ताण पडत होता. रुग्णांना अपेक्षित सेवा देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत होती. यातून तक्रारी वाढत जाऊन वादविवाद होत होते. प्रशासनदेखील त्यामुळे मेटाकुटीला आले होते. अखेर सहकार्य मिळावे, यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली. त्यामध्ये सर्वांनी आपल्यापरीने मदत केली. तेव्हा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी व्हावा यासाठी दी यश फाउंडेशन, परकार हॉस्पिटलच्या नर्सिंग कॉलेजच्या ६२ मुलींना सेवेत सामावून घेतले होते. महामारीमध्ये या मुलींमुळे आरोग्य विभागचा बराचसा भार कमी केला होता. परंतु दोन महिने या मुलांना प्रशासनाने पगारच दिला नव्हता. या कोरोना योद्ध्या पगाराविना असल्याने त्यांनी काम थांबविले.महिला कोविड रुग्णालयावर याचा परिणाम झाला.
हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली. याबाबत मंत्री उदय सामंत म्हणाले, नर्सिंग कॉलेजच्या सेवेत घेतलेल्या ६२ मुलींना २ महिने पगार न दिल्याने काम थांबले. ही बातमी प्रसिद्ध केली आहे. त्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पाटील आणि आम्ही या मुलींचा पगार तत्काळ देण्याचा निर्णय घेतला; मात्र ज्या मुलींना परीक्षेसाठी जायचे आहे त्यांनी जावे; ज्या मुलींना परत हजर व्हायचे आहे त्या पुन्हा हजर होऊ शकतात. तशी परत ऑर्डर देण्यात येईल.









