रत्नागिरी:- अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत. या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोंथा चक्रीवादळ मंगळवारी रात्रीच एक वाजता आंध्रप्रदेशच्या किनारी धडकले. आता त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले. त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू असून, गुरुवारी हे क्षेत्र विदर्भालगत असेल. शुक्रवारी त्याचा प्रवास मध्य प्रदेशच्या दिशेने सुरू राहील आणि त्याच दिवशी हे क्षेत्र युपी, बिहारच्या दिशेने सरकत सिक्कीमकडे वाटचाल करील. त्यामुळे पुढील तीन दिवस या परिसरात पावसाची शक्यता आहे; तर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाचे क्षेत्र धिम्या गतीने पुढे सरकत आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्ट्यांच्या आसपास रेंगाळला.
शुक्रवारी हे क्षेत्र दक्षिण गुजरातसह लगतच्या परिसरात प्रवेश करील. त्यामुळे गुरुवारसह शुक्रवारी किनारी प्रदेशात पावसाचा अंदाज आहे. मुंबईत गुरुवारी दिवसभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे; तर शुक्रवारसह शनिवारीही मुंबईत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.









