४५० इतर मागासवर्गीयांना २ कोटींचे वाटप; १० लाखांपर्यंत मिळतेय बिन व्याजी कर्ज

रत्नागिरी:- राज्यातील इतर मागासवर्गीय पात्र व्यक्तींच्या सर्वांगिण आर्थिक व सामाजिक विकासासाठी अल्प व्याज दराने स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत गेल्या गेल्या  २३ वर्षात ४५० लाभार्थ्यांना २ कोटी रु.कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात वैयक्तीक व्यावसायासाठी ६ लाभार्थ्यांना ६ लाख तर ७ लाभार्थ्यांना प्रत्येकी १० लाख असे ७६ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले असून त्यांना कर्जाच्या व्याजाचा परतावा महामंडळाकडून देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना व्यवसायाला बिन व्याजी कर्ज उपलब्ध झाले आहे.

राज्यातील मागास वर्गाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांना व्यावसायात आर्थिक सहाय्य करण्यासाठी राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सन १९९९ पासून हे महामंडळ कार्यरत आहे. तेव्हापासून रत्नागिरी जिल्ह्यात मंडळाच्या कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले जात आहे.सध्या टिआरपी येथील सामाजिक न्याय भवनात राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळचे कार्यालय असून त्यांच्यामार्फत  २० टक्के बीज भांडवल योजना, १ लाख रु. पर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा १० लाखांपर्यत कर्ज, गट कर्ज व्याज परतावा , शैक्षिणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येतात.रत्नागिरी कार्यालयातून गेल्या २३ वर्षात  ४५० लाभार्थ्यांना २ कोटी रु.चे वाटप करण्यात आले आहे.चालू आर्थिक वर्षात ६ वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख या प्रमाणे ६ लाख रु. तर ७ लाभार्थ्यांना प्रत्येकी १०लाखाप्रमाणे ७० लाखाचे वाटप करण्यात आले आहे.सध्या महामंडळामार्फत व्याजाचे परतावा देण्यात येतो.यासाठी प्रत्येक महिन्यात वेळेवर हप्ता भरल्यानंतरच व्याज परताव्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत आहे.