२२३ एसटी बसेस निवडणूक कर्तव्यावर, शालेय फेऱ्या बंद

रत्नागिरी:- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील विविध केंद्रांवर मतदान साहित्य तसेच तेथे नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहतुकीसाठी २२३ एसटी बसेस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त आणण्यासाठी स्वतंत्र ३५ बसेस नाशिकला पाठवण्यात आल्या आहेत. आज दुपारपासून जिल्ह्यातील केंद्रावर एसट्या रवाना झाल्या.
निवडणूक प्रक्रियेसाठी आज आणि उद्या जिल्ह्यातील स्थानिक मार्गावरील शालेय फेऱ्या बंद राहतील. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू राहणार आहेत. खासगी कंपन्यांत काम करणाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळेत, जिथे आवश्यक आहे त्या ठिकाणी एसटी बसेस धावणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाकडे ७००हून अधिक गाड्या आहेत. जिल्ह्यातील ९ आगारातून या बसेस शहरासह मध्यम, लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदिवशी गावाकडील बऱ्याच मार्गावरील बसवाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. ७ फेब्रुवारीला मतदानादिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीचे साहित्य व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी एसटी बसेस लागणार आहेत. त्यामुळे २२३ बसेस गाड्या निवडणुकीसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात मतमोजणी होणार असून, तिथूनच मतदान पेट्यांचे वाटप आज झाले. दुपारपासून केंद्रांवर बसेस साहित्य व कर्मचाऱ्यांना घेऊन रवाना झाल्या.
एसटी महामंडळाच्या मोठ्या प्रमाणात गाड्या आरक्षित झाल्यामुळे नियमित बसफेऱ्यांवर याचा मोठा परिणाम होणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी एसटी बसेस धावणार असल्याचे सांगण्यात आले. बसेस निवडणुकीसाठी असल्यामुळे सामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.