रत्नागिरी:- रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे १५ सप्टेंबर २०२१ पूर्वी योग्य गतीने सुरू न झाल्यास या बस स्थानकाचे महाआघाडी शासनाचे अकार्यक्षम कारभाराचे बोधचिन्ह असे जाहीर नामकरण करून तसे बोर्ड त्या ठिकाणी उभे केले जातील असा इशारा ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. दक्षिण रत्नागिरी यांनी दिला आहे.
रत्नागिरी बस स्थानकाचे काम गेली दोन वर्ष ठप्प पडून आहे. रत्नागिरी शहरावर झालेली भळभळती जखम अस वर्णन रत्नागिरी एस.टी. स्टँडच्या ठप्प पडलेल्या कामाचे करता येईल. नागरिकांना, पॅसेंजरना रत्नागिरी शहरातील वाहतुकीला या स्टँडच्या कामामुळे दोन वर्षे वेठीस धरण्यात आले आहे. गेली दोन वर्ष काम ठप्प आहे. अकार्यक्षमतेचे हे बोलके उदाहरण आहे. महाआघाडी शासनाच्या अकार्यक्षम कारभारचा हा नमुना आहे. हे काम पुढे जावे, पूर्णत्वास पोहचावे अशी इच्छा शक्ती राज्यकर्त्यांमध्ये नाही. कंत्राटदारांवर कारवाई होत नाही. अधिकारी पाठपुरावा करत नाहीत. लोकप्रतिनिधी सत्तेत मश्गुल आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रत्नागिरी मध्यवर्ती एस.टी. स्टँडचे रखडलेले काम.
रत्नागिरीच्या मध्यवर्ती ठिकाणाला कुरूप बनवण्याचे योजून ही वाटचाल सुरू आहे. पॅसेंजर, नागरिकांना स्टँड समोरील रस्त्यावरील रहदारीला या ठप्प कामाचा फटका रोज बसत आहे. गेल्या दोन वर्षात बाहेरगावी जाणाऱ्या पॅसेंजरसाठी आसरा शेड ही एस.टी प्रशासन, शासन यंत्रणा उभी करू शकली नाही व पाऊस सोसत एस.टी.स्टँड समोरच्या स्टॉपवर बाहेर गावी जाणारे पॅसेंजर तसेच उभे असतात. मात्र ठिम्म शासन, प्रशासन यंत्रणा ध्यानस्थ आहे.