१५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यात ८१ कोटींची विकासकामे 

रत्नागिरी:- गावातील विकास कामांना चालना देण्यासाठी १५ वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींना निधी मिळवून देण्यात आला आहे. आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्याला २६१ कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचवार्षिक आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आतापर्यंत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हापरिषद या तिन्ही यंत्रणांकडून ८१ कोटी ५ लाखाची कामे पूर्ण झाली आहेत.

पंधराव्या वित्तचा पंचवार्षिक आराखडा तयार असून त्यामध्ये समाविष्ट कामे निधी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ सुरु करण्यात आली आहेत. पावसाळ्याच्या चार महिन्यामध्ये बांधकामांची कामे करताना येत नाहीत. नोव्हेंबर महिन्यापासून गावागावातील रस्ते, पाखाड्या, पाणी योजना, इमारत बांधकामाची कामे सुरु झाली असून काही कामे पुर्णही करण्यात यश आले आहे. शैक्षणिक व आरोग्य साहित्य वाटप यासह अन्य गोष्टींवरील खर्च केला जात आहे. दिड वर्षांमध्ये जिल्ह्याला लोकसंख्येनुसार २६१ कोटी २२ लाखाचा निधी प्राप्त झालेला आहे. यामध्ये ८० टक्के ग्रामपंचायतीला तर जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी वितरीत केलेला आहे. थेट ग्रामपंचायतीला निधी मिळत असल्याने गावस्तरावर नियोजन करणे शक्य होत आहे. पुढील चार महिन्यात पावसाळ्यापुर्वी विकासकामांचा वेग वाढणार आहे. ग्रामपंचायत निवडणुक आचारसंहितांमुळे विकासकामांमध्ये अडथळा निर्माण होतो. भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये या निधीतील कामे रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुर्ण झालेल्या कामांची माहिती पाहण्यासाठी इ ग्राम स्वराज हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत अशी माहिती संकलित केलेली आहे.

५५ ग्रामपंचायतींचा निधी थकला

ग्रामपंचायतीमधील पदाधिकार्‍यांची मुदत संपुष्टात आल्यानंतर प्रशासक नेमला जातो. अशा ग्रामपंचायतींना १५ व्या वित्तचा निधी वितरीत केला जात नाही. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींचा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी वितरीत करणे शिल्लक आहे. संबंधित ग्रामपंचायतींमधील निवडणुक प्रक्रिया पुर्ण झाली असून नवीन कार्यकारीणी कार्यान्वित झाली आहे. तरीही हा निधी मिळालेला नसल्याने त्याचा कामांवर परिणाम होत आहे.