रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील पहिले १०० खाटांचे महिला रुग्णालय शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आले असून या महिला रुग्णालयाचे अजूनही लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे अनेक महिला हे रुग्णालय महिलांसाठी केव्हा कार्यरत होणार ? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत.
गेले अनेक वर्षे सुरु असणारे महिला रुग्णालयाचे काम पूर्ण होते न होतो तोच कोरोना आला आणि महिला रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून अस्तित्वात आले . मात्र आता कोविड गेला तरी या रुग्णालयाचे महिला रुग्णालय म्हणून लोकार्पण करण्यात आलेले नाही . या रुग्णालयातील विविध विभाग सुरु करणे गरजेचे आहेत . तसेच यातील काही भाग विविध आस्थापनांसाठी घेण्यात आला असला तरी जिल्ह्यातील हे एकमेव रुग्णालय महिला रुग्णालय म्हणून सुरु होणे गरजेचे आहे . जे प्रयोजन आणि नियोजन होते त्याला यामुळे खीळ बसत आहे . रत्नागिरीचे वाढते शहरीकरण आणि महिलांच्या वाढणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी याचा विचार करता महिला रुग्णालय निश्चितच महिलांसाठी उपयोगी ठरेल . परंतु त्याचे लोकार्पण मात्र गेले अनेक महिने रखडल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे . तसेच या रुग्णालयाच्या समोर शासकीय डॉक्टरांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे . परंतु त्यांचीही कामे अत्यंत धिम्या गतीने सुरु झाली असून ती पूर्ण झालेली नाहीत.









