ह. भ. प. शरद बोरकर प्रतिष्ठानची स्थापना; पहिल्या आठवड्यात दिव्यांग शोध मोहीम व मदतकार्य

खंडाळा:- रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती तसेच अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख स्व. शरद बळीराम बोरकर यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त खंडाळा येथे नुकतीच ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजपयोगी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

शरद बोरकर यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती असताना त्यांनी केलेले कार्य व शिवसेनेच्या माध्यमातून आणि इतर संघटनाच्या द्वारे सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन केलेले परिवर्तन अविस्मरणीय होते. आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर त्यांनी आपल्या विभागासह ग्रामीण जनतेला व्हावा यासाठी प्रयत्न केला. आपल्या आयुष्यात त्यांनी सदैव लोककल्याणकारी योजना सर्वदूर पोहचाव्यात यासाठी विशेष प्रयत्न केले. विविध व्यासपीठावरून सामाजिक कार्याचा सन्मान केला. यामुळे त्यांचे हेच कार्य कायमस्वरूपी समाजामध्ये प्रसारित व्हावे व सर्वत्रच सर्वांना न्याय मिळावा या हेतूने आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, अध्यात्मिक, कला व क्रीडा या क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी व विविधांगी उपक्रम राबविण्यासाठी शरद बोरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकतीच खंडाळा येथे या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आलेली आहे. 

प्रतिष्ठानच्या स्थापनेदिवशीच ह. भ. प. शरद दादा बोरकर प्रतिष्ठान व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान दिव्यांग व्यक्ती शोध मोहीम व मदतकार्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. ज्यामध्ये दिव्यांग लाभार्थी यांचे फॉर्म भरणे, तपासणी साठी सहकार्य करणे, प्रमाणपत्र मिळवून देतानाच आवश्यक मदतकार्य करणे असे स्वरूप या सप्ताहाचे असेल.  

तसेच या प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यात सदैव लोकोपयोगी व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर भर असणार आहे, असे मत प्रतिष्ठानच्या वतीने समीर बोरकर आणि वरवडे गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते निखिल बोरकर यांनी व्यक्त केले. या प्रतिष्ठानचा शुभारंभ ज्येष्ठ शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते नारायण बोरकर, सामाजिक कार्यकर्ते शेखर भडसावळे, डॉ. अनिलकुमार कांबळे, पंचायत समिती सभापती संजना माने, पंचायत समिती माजी सभापती मेघना पाष्टे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शरद चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी निखिल बोरकर, अनिलकुमार कांबळे, शरद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करत शरद बोरकर साहेबांनी दिलेला वसा प्रतिष्ठानने सदैव सुरू ठेवावा व सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. 

यावेळी माजी सैनिक रामचंद्र सावंत, तुषार चव्हाण, प्रसाद पेढे, अप्पा धनावडे, जयवंत गुरव, , शशांक बोरकर, संदेश महाकाळ, उदय बोरकर, विजयराव धनावडे, रजत पवार,  अंजली पारकर, स्वरूपा गजने, सई बोरकर, निनाद चव्हाण, नारायण काताळकर,  यांच्यासह स्व. शरद दादा बोरकर यांचा मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.