पारंपरिक वेशभूषेत १२ हजार नागरिक उपस्थित
रत्नागिरी:- श्री देव भैरी जुगाई, नवलाई, पावणाई, तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या माध्यमातून बुधवारी हिंदू एकतेचे दर्शन घडवत हिंदू नववर्ष स्वागतयात्रा जल्लोषात काढण्यात आली. यामध्ये पारंपरिक वेशभूषेत रत्नागिरीकर हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेत १०० हून अधिक संस्था, चित्ररथ सहभागी झाले. तसेच यंदा १२ हजारांहून अधिक हिंदू बंध-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. शिवतांडव अथवा अघोर लिलादर्शन, लाठीकाठी, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि शिवकालीन तलवारबाजीची प्रात्यक्षिके सादर झाली.
ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिरात गुढी उभी करून, गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेस प्रारंभ झाला. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी श्रीफळ वाढवले. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थित होते. शहराच्या विविध मार्गांवरून रथयात्रा येत असताना अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी, स्वागतासाठी रांगोळ्या, पताकांनी वातावरण भगवेमय झाले होते. सकाळी ९ वाजता मारुती मंदिर येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वागतयात्रा सुरू झाली.

स्वागतयात्रेच्या मार्गावर सर्वत्र गुढ्या उभारण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले होते. नाक्यानाक्यावर चित्ररथांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यंदा अनेक संस्थांनी प्रथमच स्वागतयात्रेत भाग घेतला होता. सर्वांनी एकमेकांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अनेक चित्ररथांनी आपल्या माध्यमातून विविध संदेश दिले.रत्नागिरीच्या इतिहासातील हिंदू एकतेचे दर्शन घडवणारी एक भव्य यात्रा म्हणून या स्वागत यात्रेची नोंद होईल, असे अनेकांनी सांगितले.
स्वागतयात्रेमध्ये प्रभू श्रीराम, कृष्ण यांचे देखावे सादर केले. तसेच भजन पथक, ढोल-ताशे पथक, मच्छीमारीसंदर्भात देखावा, देवरुख ओझरेखुर्द येथील गंगावेस तालीमचे शिवकालीन खेळ लक्ष्यवेधी ठरले. तसेच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने प्रथमच भाग घेत उत्तम आरोग्यासाठी सायकल चालवण्याचा संदेश दिला

ग्रामदैवत भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष आनंद मराठे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, बाबा परुळेकर, संतोष पावरी, राजन जोशी अॅड. विलास पाटणे, बाबू म्हाप, राहुल पंडित यांच्यासमवेत हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मारुती मंदिर येथे सचिन वहाळकर, कोमल सिंग, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, मुकुंद जोशी, राकेश नलावडे हर्ष दुडे शहर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
शिवतांडवाचा थरार
मारुती मंदिर येथून २५ हून अधिक चित्ररथ, संस्था सहभागी झाल्या. मारुती मंदिर येथून श्री मरुधर विष्णू समाज व राजस्थान क्षत्रिय समाजाचा शंभो महादेवाचा रथ सहभागी झाला. यामध्ये दिल्लीतील कलापथकाने शिवतांडव, शंभू महादेव, पार्वती, आणि यक्ष भूत अघोरी नागा साधू, महाकाली अशी विभिन्न रूप प्रदर्शन पाहायला हजारो हिंदूची गर्दी झाली. आगीवर रॉकेल फुंकणे, स्मशानातील प्रसंग, अघोरी नागा साधूंनी थरारक शिवतांडव सादर केले आणि सर्वांनी शिवशंभोचा गजर केला.
स्वागतयात्रेत सहभागी संस्था-
भैरी मंदिरातून सहभागी रथ- बैलगाडी, ढोल पथक, ग्रामदैवत श्री देव भैरी, श्री भैरीबुवा पालखी स्व. अरुअप्पा जोशी चित्ररथ, स्वयंभू काशिविश्वेश्वर देवस्थान, विठ्ठल मंदिर संस्था, विक्रांत मित्रमंडळ, एमएससीआयटी, ब्राह्मण जागृती सेवा संघ, अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळ, शिवानी ग्रुप गवळीवाडा, समस्त रत्नागिरी कुंभार समाज परिवार, अखिल हिंदू गणेशोत्सव पतितपावन मंदिर, श्रीराम मंदिर संस्था, राष्ट्रीय सेवा समिती, श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था, श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज मंडळ, सागरी सीमा मंच छत्रपती व मावळे, जाकिमिऱ्या शिमगोत्सव, जाकीमिऱ्या मच्छीमार सोसायटी, मिऱ्या ते पंधरामाड ग्रामस्थ, खल्वायन संस्था, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघ, तालुका भंडारी समाज, ब्रह्मरत्न, महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था, श्री सिद्धिविनायक चक्रीभजन मंडळ, स्वामी समर्थ, विश्व हिंदू परिषद, ब्रह्मनाद ढोलताशा पथक, जायंट्स क्लब ऑफ रत्नागिरी, संस्कार भारती, कांदळवन प्रतिष्ठान, गंगावेस तालीम देवरुख ओझरखुर्द, दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग.
मारुती मंदिर येथून सहभागी चित्ररथ- घोडेस्वार, भारत माता, स्वामी विवेकानंद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, स्वामी समर्थ सेवा सांस्कृतिक केंद्र (दिंडोरीप्रणित), कोकणचा राजा मित्रमंडळ पॉवरहाऊस, पालखी व ढोलपथक, ओम साई मित्रमंडळाचा छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुत्व पुस्तकाचा देखावा, पावनखिंड, सायकलिस्ट क्लब, श्री मरूधर विष्णू समाज, ढोलपथक ओम साई चाळकेवाडी, संस्कृत भारती, पांचाळ सुतार समाज चित्ररथ, इस्कॉन रथ, पाटीदार सनातन समाज, नवलाई ढोल पथक, आकार डान्स अॅकॅडमी, गो सेवा संघ, राजरत्न प्रतिष्ठान, हर्षा मोटार ट्रेनिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांतर्फे सुरक्षित वाहन चालवण्याचे मार्गदर्शन करणारा रथ, हिंदू जनजागृती समिती, लाठीकाठी व स्वसंरक्षण प्रशिक्षण, प्रजापिता ब्रह्मकुमारी, जय भैरी मित्रमंडळ मिरजोळे- कुवारबाव, शिवरुद्रा ढोल पथक.