रत्नागिरीः– कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या हार्टसप या प्रकल्पात यावर्षीपासून काजूचाहि समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बरोबरच काजूवरहि कोणत्या कीड, रोगांचा प्रदुर्भाव झाला आहे याची माहिती मिळून तत्काळ उपाययोजना करता येणार आहे.त्यामुळे शेतकर्यांचे होणारे नुकसान कमी होणार आहे.
कृषी विभागामार्फत सन २०१५‚१६ पासून आंबा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हार्टसप)राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत किडी व रोगांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यासाठी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये स्वतंत्र कीड सर्वेक्षकाची नेमणूक केली असून कृषी पर्यवेक्षक सर्वेक्षण करतात.
या प्रकल्पाअंतर्गत २ हजार क्षेत्राला एक कीड सर्वेक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. काजूसाठी ४३ कीड सर्वेक्षक तर आंब्यासाठी ३५ कीड सर्वेक्षक ची नियुक्ती करण्यात आली आहे. काजू, आंबा साठी प्रत्येकी ९ कृषी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आठवड्यात एका कीड सर्वेक्षकामार्फत ३२ ठिकाणी भेटी देवून तेथील बागांमध्ये कोणत्या रोगांचा प्रदुर्भाव झाला आहे याची पाहणी केली जाते. तर प्रत्येक तालुक्याला एक शेतीशाळा घेतली जाते. त्यामध्ये शेतकर्यांना मार्गदर्शन केले जाते. चालू वर्षात हार्टसप या प्रकल्पासाठी ५ लाख ८९ हजार ४१६ रु.ला मान्यता मिळाली असून यातिल २ लाख ७३ हजार २०८ रु.प्रप्त झाले असून १ लाख ३ हजार रु.खर्च झाले आहेत. आंबा बरोबर काजू हे कोकणातील अतिशय महत्त्वाचे पीक आहे. या पिकांमध्ये कोकणाचा आर्थिक कायापालट करण्याची क्षमता आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या पिकांची फार मोठ्या प्रमाणावर लागवड झालेली आहे व ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अलीकडील बदलत्या वातावरणामुळे आंब्याबरोबर काजूवरील कीड, रोगाच्या समस्यादेखील गंभीर होत आहेत.
कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे निसर्गाचा समतोल ढासळून पिकावरील दुय्यम समजल्या जाणार्या किडी पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान करतात. तसेच कोकण विभागातील उष्ण व दमट हवामान रोग व किडीस पोषक असल्यामुळे पीक संरक्षण समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत पीक संरक्षणास एक वेगळी दिशा देण्यासाठी कीटकनाशकांचा शक्यतो कमीत कमी वापर करून एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे.
आंबा, काजू पिकाचे सर्वेक्षण करून हंगामनिहाय कीड‚रोगाचे प्रादुर्भावबाबत शेतकर्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे. कीड रोगांच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकर्यांचे नुकसान टाळणे. कीड रोगांच्या प्रादुर्भाव वेळीच लक्षात आल्याने पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. कीड‚रोगांबाबत शेतकर्यांना प्रशिक्षित करून कीड‚रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे. कीड रोगांच्या प्रादुर्भावित क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत पीक संरक्षण औषधे उपलब्ध करून देणे. कायम स्वरूपाच्या व्यवस्थापनाबाबत कृषी विद्यापीठांच्या साहाय्याने शिफारशी निश्चित करणे आदी उद्देश या योजनेचे आहे.