काटेरी तारेच्या कुंपणात अडकलेल्या तरुणाला अग्निशमन दलाने वाचवले
रत्नागिरी:- येथील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील प्लॉट नंबर P-24 मध्ये वेल्डिंगचे काम करत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक तरुण कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोशन घवाळी असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वेल्डिंग कामगाराचे नाव आहे. उंचावरून पडत असताना बाजूने जाणाऱ्या हायव्होल्टेज वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने आणि त्यानंतर सुरक्षा तारांमध्ये अडकल्याने हा तरुण गंभीररित्या भाजला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मिरजोळे एमआयडीसी येथील प्लॉट नंबर P-24 मधील घरमालक अब्दुल रहमान अन्सारी यांच्या घराजवळ पत्रे लावण्याचे आणि वेल्डिंगचे काम सुरू होते. यावेळी रोशन रामचंद्र घवाळी (वय ३१, रा. पानवल घवाळीवाडी, रत्नागिरी) हा कामगार उंचावर चढला होता. काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट खाली कोसळला.
ज्या ठिकाणी रोशन पडला,तिथूनच एफसीआय गोदाऊनच्या भिंतीपलीकडून महावितरणची एक्स्टेंशन वीज वाहिनी जाते. खाली पडत असताना रोशनचा या हायव्होल्टेज वाहिनीला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा शॉक लागला. या धक्क्यामुळे त्याची पाठ पूर्णपणे जळाली. वीज वाहिनीवरून खाली पडताना तो कंपाऊंडच्या सुरक्षेसाठी लावलेल्या काटेरी तारांच्या कुंपणात जाऊन अडकला, ज्यामुळे त्याचा पायही गंभीररित्या फाटला. या दुहेरी अपघातामुळे तो अत्यंत गंभीर अवस्थेत तिथेच अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच मिरजोळे एमआयडीसी अग्निशमन दलाचे जवान एका क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांनी कटरच्या सहाय्याने कंपाऊंडच्या सुरक्षा तारा कापल्या आणि अडकलेल्या रोशनची सुरक्षित सुटका केली.
अग्निशमन दलाने केवळ १० मिनिटांच्या आत जखमी तरुणाला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.
अत्यंत संवेदनशील आणि भीषण परिस्थितीत जीवाची बाजी लावत एमआयडीसी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी हे बचावकार्य राबवले. यामध्ये:आनंद राऊत,दिलीप दळवी हर्षल आकडे,प्रमोद राठोड,यतीराज मोरे,ओम यादव,शुभम गायकवाड आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. अग्निशमन दलाच्या या तत्परतेमुळेच जखमी तरुणाला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे शक्य झाले असून, परिसरातून या जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.









