हायटेक बसस्थानकाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला मिळणार वाढीव फरक

रत्नागिरी:- गेली चार वर्षे रखडलेल्या येथील हायटेक एसटी बसस्थानकाचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. ठेकेदाराला वाढीव फरक देण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शविली आहे. त्यात पालकमंत्री उदय सामंत त्यांनीही यामध्ये लक्ष घातले आहे. काही कामगार लावून प्राथमिक कामाला सुरवात केल्याचा दावा एसटी प्रशासनाने केला आहे. ठेकेदाराची मागणी आणि राजकीय घडामोडीमुळे रखडलेले हे काम पुढच्या महिन्यात सुरू होणार असल्याचे एसटी विभागाने सांगितले.  

एसटी बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या हायटेक प्रकल्पाच्या बांधकामाला कोरोनाचा फटका बसला. त्यानंतर रेंगाळलेल्या या कामाला अजुनही गती मिळालेली नाही. कोरोना महामारीमुळे कामाला ब्रेक लागला. जनतेशी थेट संबंधित असलेला हा 10 कोटीचा नूतन बसस्थानकाचा प्रकल्पाच्या कामातील विघ्न काही संपत नव्हती. सुरवातीला हायटेक बसस्थानकाचा प्रकल्पाचे प्रेझेंटेशन तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांसमोर झाले. आराखड्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या. शॉपिंग सेंटर किंवा व्यापारी गाळे आत ठेवण्याऐवजी दर्शनी उभारून एसटी आत आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग करण्याचे सुचविण्यात आले आहे. त्यानुसार नवीन आराखडा करून प्रकल्पाच्या काम सुरू करण्यात आले. कोल्हापूरच्या ठेकेदाराला याचा ठेका देण्यात आला. सुरवातीला काम चांगल्या पद्धतीने सुरू होते. परंतु त्यानंतर ते रेंगाळले ते अजून तसेच आहे. त्यामुळे एसटी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना थांब्यावर वाद निर्माण होत आहेत. प्रसार माध्यमांनी हा विषय़ उचलून धारल्यानंतर खासगी तत्वावर एक प्रवासी निवारा शेड उभारण्यात आली.
एसटी पार्किंगसाठी पालिकेकडे मागण्यात आलेली जागादेखील पालिकेने नाकारली. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच गाड्या पार्किंग करून ठेवल्या जाऊ लागल्या. त्यानंतर बांधकामाची गंती मंदावली. अखेर तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीवरून सामंत यांनी स्वतः कामाची पाहणी केली. या वेळी ठेकेदाराची कान उघाडणी करून त्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी एका अधिकार्‍याची नियुक्ती केली. त्यानंतर कामाला काहीशी गती मिळाली. परंतु कोरोना महामारीचे संकट आले आणि कामाला पुन्हा खो मिळाला. जेवढे कामगार होते ते कोरोनाच्या भीतीने निघून गेले. तसेच ठेकेदाराने केलेल्या कामाचे सुमारे 40 लाखाचे बिलदेखील एसटी महामंडळाकडून रखडले होते. मात्र ते काही महिन्यापूर्वी आदा करण्यात आले.अजुनही या नुतन बसस्थानकाच्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.