हायटेक निर्णय; प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी आता ऑनलाईन

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभाग हायटेक बनत आहे. प्राथमिक शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधी आता ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका क्लिकवर शिक्षकांना ती माहिती पाहता येणार आहे. जिल्ह्यातील सात हजार शिक्षकांना याचा लाभ मिळेल अशी माहिती शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी दिली.

जिल्हा परिषदेत सर्वाधिक आस्थापना प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. या शिक्षकांची सेवा पुस्तके तसेच भविष्य निर्वाह निधी, पेंशन आदी काम बघताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षकांच्या अनेक समस्या असतात. त्या कमी करण्यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये भविष्य निर्वाह निधीची माहिती ऑनलाईन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सात हजार शिक्षकांची माहिती ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शिक्षकाला एक कोड नंबर दिला जाणार आहे. तो जिल्हा परिषदेच्या संबंधित पोर्टलवर टाकल्यानंतर निधीचा तपशील शिक्षकांना पाहता येणार आहे. बहूतांशवेळी शिक्षकांना याची माहिती तपासण्यासाठी जिल्हा परिषदेत खेटे घालावे लागत होते. ते आता कमी होणार आहेत. याबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कर्मचार्‍यांच्या सेवा पुस्तकांमध्ये वेळीच नोंदी न झाल्यामुळे सेवा निवृत्तीवेळी पेशन व इतर वित्तीय लाभ देताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षकांची सेवा पुस्तके विविध प्रकारच्या नोंदी वेळेत न घेतल्यामुळे अद्ययावत नसतात. अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी सेवापुस्तके अपडेट करण्यासाठी पदभार स्विकारल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केला आहे. 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.