कोकण हापूस आंबा उत्पादक संस्था; रेल्वे स्थानकावर विक्री व्यवस्था
रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या स्थानकांवर हापूस आंबा विक्रीसाठी देण्यात येणारे स्टॉल कोकणातील पाच जिल्ह्यातील शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत विक्रेते यांनाच द्यावेत. त्यासाठी आवश्यक पुराव घ्या. ही मागणी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेतर्फे करण्यात आल्याचे मुकुंद जोशी यांनी सांगितले.
कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी कोकण रेल्वेकडून वेळोवेळी वेगवेगळे उपक्रम राबविले गेले आहेत. वाहतूकीसाठीही प्राधान्य दिल्यामुळे हापूसचे नाव दूरवर पोचण्यास मदत झाली. कोकणातील पाच जिल्हातील भौगोलिक परिस्थितीमध्ये जो तयार होतो तोच अस्सल हापूस आहे, हे भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर स्पष्ट झाले आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था, आंबा उत्पादक सहकारी संस्था मर्यादित केळशी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ या चार संस्था हापूस जीआयचे प्रोप्रायटर आहेत. त्यामुळे हापूसच्या संबंधात प्रसार, प्रचार, शेतकर्याला हापूसचे भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून देणे ही कामे या संस्था करत आहेत. जीआय मिळाल्यावर कोकणचा शेतकरी खूष झाला आहे. बाजारात हापूसच्या नावाखाली कोकण सोडून इतर प्रदेशात पिकवलेले आंबेही आता काही नाठाळ व्यापारी दलाल विकण्याचा प्रयत्न करतात. त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांवर स्थानिक शेतकर्यांना हापूस आंबा विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. या शिवाय रेल्वेमध्येही फिरत्या विक्रेत्यांनाही हापूस विक्रीची परवानगी दिली जाणार आहे. हा निर्णय सुयोग्य व शेतकरी हिताचा आहे. परंतू हे स्टॉल देण्यापूर्वी संबंधित व्यक्ती शेतकरी किंवा त्याचा मान्यता प्राप्त प्रतिनिधी आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो शेतकरी सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यातील आहे का याचा पुरावा घ्यावा. शिवाय शेतकर्याच्या नावे सातबारा असल्याची पाहणी करावी. त्यांने भौगोलिक मानांकन, मँगोनेट नोंदणी केली आहे का याची खात्री करावी अशी मागणी करण्यात आली आहे.