हापूस बचावसाठी चळवळ उभी राहणे आवश्यक

बागायतदारांच्या प्रतिक्रिया; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा 

रत्नागिरी:-पावसाचा आंबा पिकावर परिणाम होऊ नये यासाठी कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठाकडून बागायतदाराना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे. आंबा व्यवसायात टिकून राहण्यासाठी स्वतःहुन चळवळ उभी केली पाहिजे अशा प्रतिक्रिया आंबा बागायतदाराकडून व्यक्त केल्या जात आहेत. वादळ आणि अवकाळी पाऊस यात बागायतदारांचे अतोनात नुकसास झाले आहे. यातून बाहेर येण्यासाठी प्रशासनाने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा बागायतदार यांच्याकडून केली जात आहे. 
 

यंदाच्या हंगामातला हापूसच्या झाडांना आलेला साफ दिसणारा मोहोर हा कळीमधून बाहेर येतोय पुढे साफ आणि मागे थोडासा खराब झालेला मोहोर हा अर्ध्याअवस्थेमधला म्हणजेच नुकताच कळीतून उमलत असलेल्या अवस्थेतला आहे. पूर्ण फुलोरा सोडून बाहेर पडलेला मोहोर खराब झाला आणि त्यावर तयार झालेला कणी अवस्थेतली दाणा काळपट झाला आहे. हे सर्व २ व ३ डिसेंबरला कोसळलेल्या पावसामुळे घडलं आहे. नुसता सरीवर पाऊस चालला असता, पण हे दोन दिवस पूर्ण ढगाळ वातावरण राहीले आणि सूर्यप्रकाश अजिबात नव्हता. त्यामुळे मोहोर आलेल्या झाडांवर पाणी तसच राहील आणि ही स्थिती सध्याच्या मोहोराची आहे. कृषि विभागाकडून काडीची अपेक्षा नाही. कृषि विद्यापीठे चकार शब्द काढत नाहीत.बागायतदार कुणीही काहीही सांगेल तसा सैरावर होऊन फवारण्या करून जे काही वाचवता येईल या आशेने पळत सुटला आहे. दोन दिवसापूर्वी वेळापत्रकाप्रमाणे फवारण्या केलेल्या असूनही अवेळी पावसाने ते परत विस्कळीत केल आहे. परत वाहतूक व्यवस्था संपात अडकल्याने मजूरांचा प्रश्न गंभीर आहे. तेलांच्या किंमती वाढल्यामुळे इतर खर्चातही बरिच वाढ झाली आहे. तरीही बागायतदार यातून बाहेर पडतोय, पण नैसर्गिक संकटातून बाहेर निघण्यासाठी जी  शासकीय उपाययोजना व्हायला हवी ती अजिबात होत नाही. कृषि विभागाने किमान मोहोर संरक्षणासाठी काय उपाययोजना करता येतील हे तरी सांगायला हव होत पण ते काहीच करताना दिसत नाही. बागायतदारांना हापूस हा उद्योग बनवायचा असेल तर स्वतःच चळवळ उभी करायला हवी असे बागायतदानकडून सांगितले जात आहे.दरम्यान, गेल्या चार दिवसात वातावरण अस्थिर आहे. एक दिवस थंडी आणि दुसऱ्या दिवशी ऊन अशी स्थिती आहे. सलग थंडी पडणे आवशक्य आहे. अन्यथा पुन्हा हंगामावर परिणाम होईल अशीच भीती व्यक्त केली जात आहे.